भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या भारतीय भाषा अध्ययन विभागातर्फे ‘अभिजात मराठी भाषा अभ्यास केंद्रा’ची स्थापना करण्याचा निर्णय शुक्रवारी संस्थेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या केंद्राचे प्रमुख म्हणून प्रा. हरी नरके काम पाहणार आहेत.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करावा यासाठी महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात मराठी भाषा समिती स्थापन केली होती. यामध्ये मराठी भाषेच्या अभिजातताविषयक संशोधनामध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचा प्रमुख सहभाग होता. प्रा. हरी नरके, डॉ. श्रीकांत बहुलकर आणि डॉ. मैत्रेयी देशपांडे यांनी हा प्रस्ताव तयार करण्याच्या कामामध्ये प्रा. रंगनाथ पठारे समितीमध्ये योगदान दिले होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये आतापर्यंत प्रामुख्याने संस्कृत, पाली, अर्धमागधी आणि प्राकृत भाषांचा अभ्यास आणि संशोधन कार्य केले जात असे. शताब्दीच्या उंबरठय़ावर असलेली संस्था आता मराठी भाषाविषयक संशोधन प्रकल्प हाती घेणार आहे. त्या अनुषंगाने संस्थेच्या शुक्रवारी झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये मराठी भाषेचे अद्ययावत संशोधन आणि अध्ययन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.