मराठी भाषेच्या अभिजाततेवर जागतिक भाषातज्ज्ञांच्या मान्यतेचीही मोहोर उमटली आहे. मराठी भाषा ही ‘अभिजात’ दर्जा मिळण्यास योग्य आहे, असा निर्वाळा जागतिक भाषातज्ज्ञांच्या समितीने दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
मराठी भाषेला अभिजात भाषा असा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात मराठी भाषा समिती नियुक्त केली होती. या समितीने व्यापक संशोधन करून आणि या संशोधनाचे पुरावे सादर करीत मराठी ही अभिजात भाषा आहे हे सिद्ध करणारा व्यापक अहवाल केंद्र सरकारला सादर केला. या अहवालाचा इंग्रजी अनुवादही केंद्राकडे सुपूर्द करण्यात आला आहे. भाषेला अभिजात दर्जा मिळण्याबाबतचे सर्व निकष या अहवालाने पूर्ण केले असल्याचे साहित्य अकादमीने नुकतेच जाहीर केले आहे.
यापूर्वी ज्या भाषांना अभिजात दर्जा देण्यात आला आहे त्यांच्याबाबत फक्त भारतीय पातळीवरची तज्ज्ञांची समिती निर्णय घेत होती. यंदा प्रथमच विदेशी भाषातज्ज्ञांचेही मत जाणून घेण्यात आले आहे. या समितीमध्ये अमेरिका, फ्रान्स, चीन, जपान, स्पेन आणि रशिया या देशांतील भाषातज्ज्ञांचा समावेश होता. मराठी भाषेसंदर्भातील अहवाल या समितीसमोर ठेवण्यात आला होता. या समितीनेही मराठी भाषा अभिजात दर्जा देण्यासाठी सुयोग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे, असे या सूत्रांनी सांगितले. सध्या अभिजात दर्जा मिळावा यासाठी अनेक भाषा दावा करीत असून संबंधित यंत्रणेवर दबाव येत आहे. त्यामुळेच ‘अभिजातते’च्या निर्णयाला जागतिक परिमाण देण्याच्या उद्देशातून विदेशी तज्ज्ञांच्या मान्यतेची मोहोर उमटविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही सांगण्यात आले.