19 September 2020

News Flash

समीक्षा क्षेत्र उणे झाले

डॉ. सदानंद मोरे : जाधव यांच्या निधनाने मराठी साहित्यातील स्वयंप्रकाशी तारा निखळला आहे.

विविध मान्यवरांची श्रद्धांजली
दलित साहित्यासह विविध वाङ्मय प्रवाहांची आस्थेवाईकपणे दखल घेऊन नवोदित लेखकांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रा. रा. ग. जाधव यांच्या निधनामुळे मराठी समीक्षा पोरकी झाली आहे, अशा शब्दांत विविध मान्यवरांनी प्रा. जाधव यांना शुक्रवारी श्रद्धांजली अर्पण केली.

* डॉ. रावसाहेब कसबे : औरंगाबाद येथे मििलद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केलेल्या जाधव यांनी मराठी साहित्यिकांची पिढी उभी केली. सर्जनशील समीक्षक म्हणून त्यांचे स्थान अढळ राहील. नव्या जाणिवांनी लेखन करणारी सर्जनशील पिढी जाधव यांच्या निधनामुळे पोरकी झाली आहे.

* डॉ. सदानंद मोरे : जाधव यांच्या निधनाने मराठी साहित्यातील स्वयंप्रकाशी तारा निखळला आहे. ते कोणत्याही विशिष्ट संप्रदायाचे नव्हते, तर समीक्षेमध्ये ते स्वयंभू होते. ज्या लेखनाला लोक साहित्य मानायला तयार नव्हते त्या दलित साहित्याला जाधव यांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.

* डॉ. नागनाथ कोत्तापल्ले : १९७० नंतरच्या मराठीमध्ये जीवनाशी बांधीलकी सांगणाऱ्या लेखनप्रवाहांचे स्वागत करणारे समीक्षक म्हणून जाधव यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. ‘निळी पहाट’ हे त्यांचे महत्त्वाचे पुस्तक ठरले. त्यांच्या समीक्षेइतकीच त्यांची कवितादेखील महत्त्वाची आहे.

* डॉ. अरुणा ढेरे : पिढीचे अंतर बाजूला ठेवून मला जाधवसरांशी संवाद साधता आला, यामध्ये जाधवसरांचे मोठेपण सामावले होते. त्यांच्यासमवेत २५ वर्षे काम करताना त्यांच्याकडून खूप काही शिकण्याची संधी मिळाली. त्यांच्या विविध साहित्यकृतींनी वाङ्मय व्यवहाराचे केवळ सारथ्यच केले नाही, तर समाजाच्या समग्रतेचे भान ठेवणारा सहृदयी माणूस असेच जाधवसरांविषयी म्हणावेसे वाटते. वेगवेगळ्या साहित्य प्रवाहांची दखल त्यांच्या समीक्षेने घेतली. समीक्षेतील वैचारिकता कमी होत असताना आणि नव्या पिढीतील लेखकांना मार्गदर्शनाची आवश्यकता भासत असताना जाधवसरांचे नसणे, ही मराठी साहित्याची हानीच आहे.

* प्रा. विलास खोले : प्रसिद्ध कवी, थोर समीक्षक, विश्वकोशाचे संपादक असे वेगवेगळे पैलू असलेल्या जाधव यांनी मराठी वाङ्मयाचा इतिहास चार खंडांमध्ये संपादित करून महत्त्वपूर्ण काम केले आहे. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी मांडलेला विचार सर्वाना मार्गदर्शक ठरला आहे. दलित साहित्य आणि मराठी कवितेचे भाष्यकार म्हणून त्यांनी केलेली समीक्षा स्वागतशील आहे. प्रा. ग. प्र. प्रधान आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना त्यांनी साधना ट्रस्टच्या कामामध्ये मनापासून सहकार्य केले.

* विनोद शिरसाट : साधना साप्ताहिकाच्या ६० वर्षांतील अंकांचे आठ खंडांमध्ये संपादन करण्यामध्ये जाधवसरांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. गेल्या १२ वर्षांपासून साधना ट्रस्टचे विश्वस्त असलेल्या जाधवसरांनी साधनेच्या विविध उपक्रमांमध्ये मनापासून सहभाग घेतला आणि आम्हाला मार्गदर्शन केले. दाभोलकर यांच्यानंतर आम्हाला जाधवसरांचा आधार होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांची जगण्याची इच्छा संपली होती.

* प्रा. डॉ. विजया राजाध्यक्ष – रा. ग. जाधव यांनी दलित साहित्यापासून ते अत्याधुनिक साहित्यापर्यंत सर्व प्रकारचे समीक्षा लेखन केले. त्यांच्या निधनाने मराठी समीक्षेला उणेपणा आला आहे. अत्यंत व्यासंगी आणि विद्वान माणूस. मन:पूर्वक अध्यापन करणारे अध्यापक अशी त्यांची ख्याती विद्यार्थ्यांमध्ये होती. असा समीक्षक पुन्हा मिळणे दुर्मिळ आहे.

* विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री – रा. ग. जाधव यांच्या निधनाने मराठी साहित्यातील तत्वचिंतक हरपला आहे. संतसाहित्यापासून चित्रपट समीक्षेपर्यंत त्यांनी लेखन केले. मराठी साहित्याचे अनुभवविश्व विस्तारणारा समीक्षक गमावला आहे.

विश्वकोश महामंडळाची श्रद्धांजली!
मराठी विश्वकोश महामंडळाचे माजी अध्यक्ष व मानव्य विद्या कक्षाचे विभाग संपादक प्रा. रा. ग. जाधव यांना महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती महामंडळाच्या वाई व मुंबई कार्यालयात आज श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी डॉ. सु. र. देशपांडे, डॉ जगतानंद भटकर, प्रा. वसंतराव चौधरी, कृ.म. गायकवाड यांनी त्यांच्या विश्वकोशातील कार्यकर्तृत्वाविषयी गौरदगार काढले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 2:56 am

Web Title: marathi literary critic rg jadhav passes away
Next Stories
1 आरटीओच्या कागदपत्रांचा नागरिकांना बटवडा करण्यात टपाल खाते अपयशी
2 चार सदस्यांच्या प्रभागावर शिक्कामोर्तब
3 पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराचा खून
Just Now!
X