21 September 2020

News Flash

सहृदयी समीक्षक अन् साक्षेपी संपादक

साहित्य आणि समाज यांमधील संबंधांचे आकलन हा अंगभूत भाग

महाराष्ट्र शासनातर्फे विंदा करंदीकर यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराने प्रा. रा. ग. जाधव यांना सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे आणि ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे

साहित्य आणि समाज यांमधील संबंधांचे आकलन हा अंगभूत भाग असल्याचे मानून साहित्यकृतीची आस्वादकतेने समीक्षा करणारे प्रा. रा. ग. जाधव हे सहृदयी समीक्षक आणि साक्षेपी संपादक म्हणून ख्यातनाम होते. वेगळ्या वाटेचे आणि स्वतंत्र प्रतिभेचे कवी, दलित साहित्याचे स्वागत करणारे पहिले समीक्षक, मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे आणि ‘साधना’ साप्ताहिकाच्या साठ वर्षांच्या अंकांचे वाचन करून आठ खंडांचे संपादन करणारे साक्षेपी संपादन, सर्जनशील लेखन करणाऱ्या नवोदित लेखक-कवींना प्रोत्साहन देत त्यांना घडविणारे समीक्षक असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू होते.
रावसाहेब गणपतराव ऊर्फ रा. ग. जाधव यांचा जन्म २४ ऑगस्ट १९३२ रोजी बडोदा येथे झाला. वडिलांच्या बदलीमुळे त्यांचे कुटुंब पुण्याला आले. तत्कालीन पुणे विद्यापीठातून एम.ए. पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी मुंबई येथील एल्फिन्स्टन कॉलेज, अमरावती येथील विदर्भ महाविद्यालय आणि औरंगाबाद येथील मििलद महाविद्यालय येथे ११ वर्षे मराठी विषयाचे अध्यापन केले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठी विश्वकोष प्रकल्पामध्ये काम करण्यासाठी जाधव वाई येथे गेले. दोन दशकांच्या कामामध्ये त्यांनी संपादनाची कौशल्ये आत्मसात केली. मे. पुं. रेगे यांच्या निधनानंतर २००० ते २००२ या कालावधीत ते विश्वकोशाचे मुख्य संपादक होते. ज्येष्ठ विचारवंत प्रा. ग. प्र. प्रधान यांच्यासमवेत त्यांनी ‘साधना’ साप्ताहिकाच्या सहा दशकांतील अंकांचे आठ खंडांमध्ये संपादन करण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.
पत्नीच्या निधनानंतर १९९०च्या सुमारास प्रा. जाधव पुण्यामध्ये वास्तव्यास आले. सुरुवातीला काही काळ रमणबाग प्रशालेजवळील राजीव लॉज येथे राहिल्यानंतर ते सदाशिव पेठेतील अनपट बिल्डिंगमध्ये राहण्यासाठी गेले. २००४ मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर गच्चीवरील त्यांच्या छोटय़ाशा पत्र्याच्या खोलीतील घराविषयी चर्चा झाली होती. पुणे महापालिकेने त्यांना घर देण्यासंदर्भात ठराव संमत केला होता. मात्र त्याला जाधव यांनी नम्रपणे नकार दिल्यानंतर ‘साधना’चे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्या वेळी मुख्यमंत्री असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी मिळविलेला पाच लाख रुपयांचा निधी आणि जाधव यांच्याजवळची रक्कम एकत्रित करून शनिवार पेठेमध्ये साधना ट्रस्टच्या नावाने जाधव यांच्यासाठी छोटीशी सदनिका घेण्यात आली. एवढेच नव्हे तर दाभोलकर यांनी जाधव यांना साधना ट्रस्टमध्ये विश्वस्त करून घेतले होते. दाभोलकर पुण्यामध्ये आल्यानंतर जाधव यांच्यासमवेतच त्यांचा मुक्काम असे. ते दोघेही सकाळी फिरावयास जात असत. मात्र दाभोलकर यांचा खून झाला त्या दिवशी जाधव पुण्यामध्ये नव्हते. ही सल जाधव यांना अखेपर्यंत होती.
‘निळी पहाट’ या दलित साहित्याच्या समीक्षापर लेखनाने मराठी साहित्यामध्ये रा. ग. जाधव ही नाममुद्रा ठळकपणे उमटली. ‘निळी क्षितिजे’ आणि ‘निळे पाणी’ या त्यांच्या पुस्तकांनी दलित साहित्यप्रवाहाचे मराठी वाङ्मयातील स्थान अधोरेखित केले. ‘निवडक समीक्षा’ या त्यांच्या पुस्तकाला टागोर वाङ्मय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ‘बापू’ या कवितासंग्रहामध्ये जाधव यांच्या गांधीजींवरील ९१ कवितांचा समावेश आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये १९५० ते २००० या कालखंडातील साहित्यावर प्रकाश टाकणाऱ्या चार खंडांचे जाधव यांनी संपादन केले. औरंगाबाद येथे २००४ मध्ये झालेल्या ७७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ते बिनविरोध निवडून आले होते.

Untitled-11

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 2:58 am

Web Title: marathi literary critic rg jadhav passes away 2
Next Stories
1 ‘डीएमएलटी’ अर्हताधारकांच्या मुद्दय़ावर शासनाची चोवीस तासांत माघार!
2 बीआरटी मार्गावर झालेल्या अपघातातील जखमीचा मृत्यू
3 समीक्षा क्षेत्र उणे झाले
Just Now!
X