|| चिन्मय पाटणकर

एखाद्या घरात एकटी राहणारी गृहिणी दिवसभर काय करत असेल, तिच्या मनात काय-काय विचार येत असतील याची गोष्ट ‘कबूतर जा जा जा’ या एकल नाटय़ातून मांडण्यात आली आहे.

एकल नाटय़ हा प्रकार विशेष अवघड मानला जातो. कारण प्रेक्षकांना सादरीकरणात, कथानकात गुंतवून ठेवत पूर्ण नाटय़ानुभव देण्याचं आव्हान अभिनेत्यावर असतं. हे आव्हान पेलत एकटेपणाच्याच संकल्पनेवर बेतलेलं, नाटक कंपनी निर्मित ‘कबूतर जा जा जा’ हे एकल नाटय़ रंगभूमीवर येत आहे. शुक्रवारी (२१ जून) रात्री साडेनऊ वाजता भरत नाटय़ मंदिर येथे नाटकाचा प्रयोग होत आहे.

‘कबूतर जा जा जा’ या नाटकात मुंबईत राहणाऱ्या एका स्त्रीची गोष्ट आहे. पतीच्या नोकरीतल्या बदल्यांमुळे अनेक शहरात फिरलीय. ती मूळची इंदूरची आहे. पती कामासाठी आणि मुलं शाळेत निघून गेल्यावरची ती आणि ते घरी असतानाची ती यात खूप फरक आहे. ती दिवसभर घरात एकटीच असते. त्यामुळे घर खायला उठतं. पण तिच्या घरात कबूतरं येतात. ती त्या कबूतरांना पाहते, त्यांच्याशीच बोलू लागते. त्यांच्यात एक प्रकारे नातं तयार होतं. तिच्या मनात साठलेल्या सगळ्या गोष्टी ती कबूतरांनाच सांगू लागते. तिचा नवऱ्याशी संवाद तुटतो. गुन्हेगारीवर आधारित एक मालिका ती सतत, वेडय़ासारखं पाहत असते. अशी सगळी पाश्र्वभूमी असलेल्या या स्त्रीची कहाणी या नाटकात आहे. थरारक आणि विनोदी पद्धतीनं हे नाटक उलगडत जातं. शहराबद्दल तिच्या मनात काय असतं. तिची दृष्टीतून ती बोलते. नाटकाचं लेखन सिद्धेश पुरकरनं केलं असून, सूरज पारसनीसनं दिग्दर्शन केलं आहे. तर दीप्ती महादेव ही अभिनेत्री एकल नाटय़ाच्या सादरीकरणाची जबाबदारी निभावत आहे.

‘एक्स्प्रेशन लॅबच्या एकल नाटय़ महोत्सवात हे नाटक या पूर्वी सादर झालं होतं. आता त्याला रंगभूमीवर घेऊन येत आहोत. हे एका तासाचं हिंदी नाटक आहे. शहरांमध्ये खूप लोक घरी असतात. त्यात गृहिणींची संख्या मोठी असते. त्यांच्या जगण्यात खूप मजेशीर, थरारक असं काहीतरी घडत असेल, असा विचार होता. त्यातून या नाटकाची कल्पना सुचली. एका गृहिणीची शब्दश वेडसर, भन्नाट अशी ही गोष्ट आहे. तिच्या नजरेतून महानगरांच्या स्थितीचं दर्शन घडवण्याचा, वास्तवदर्शी; तरीही रूपकात्मक आणि तात्त्विक पातळीवर ही गोष्ट मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे,’ असं लेखक सिद्धेश पुरकरनं सांगितलं.

chinmay.reporter@gmail.com