साहित्य महामंडळ अध्यक्ष श्रीपाद जोशी यांची कबुली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य संमेलनाखेरीज आपण मराठीसाठी काहीच करत नाही या लाजेस्तव संमेलनाचे आयोजन करून तीन दिवसांचा गणपती बसविला जातो. गणेशोत्सव आणि उरुसाप्रमाणे वर्षांमध्ये किमान तीन संमेलने भरविणे एवढेच साहित्य महामंडळाचे काम उरले आहे, अशी टीका करीत धनदांडगे आणि राजसत्ता यामुळे संमेलनावर महामंडळाचे नियंत्रणच उरलेले नाही, अशी कबुली अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी शुक्रवारी दिली.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मसाप गप्पा’अंतर्गत प्रकाश पायगुडे यांनी जोशी यांच्याशी संवाद साधला. महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जोशी यांचा परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मििलद जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शक्यतो दरवर्षी संमेलन घेण्यात यावे, असे महामंडळाच्या घटनेत म्हटले आहे. याचा अर्थ दरवर्षी संमेलन भरवायलाच हवे असा होत नाही. पण, धनदांडगे आणि राजसत्ता यांच्या हितसंबंधांमुळे भरविली जाणारी संमेलने ही पश्चिम महाराष्ट्र आणि शहरांपुरतीच मर्यादित राहिली आहेत, याकडेही जोशी यांनी लक्ष वेधले. दरवर्षी संमेलन नको ही माझी भूमिका आहे. पण, माझी एकटय़ाची भूमिका ही महामंडळाची असू शकत नाही. मी माझ्या मतावर ठाम असलो तरी लोकशाहीवादी असल्याने सर्वाच्या सहमतीने ठरेल तीच महामंडळाची भूमिका असेल, असेही जोशी यांनी स्पष्ट केले. सुनीताराजे पवार यांनी आभार मानले.

बोलीमुळे प्रमाण भाषा टिकून

शहरात बसून मराठीच्या नावाने गळा काढणारे दुटप्पी आहेत. भाषिक प्रदूषण शहरात असून मराठी भाषा ग्रामीण भागातच जिवंत ठेवली जात आहे. प्रमाण भाषेचा आग्रह धरणे गैर असून बोली भाषेमुळेच प्रमाण भाषा टिकून आहे, याकडे श्रीपाद जोशी यांनी लक्ष वेधले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi sahitya sammelan
First published on: 11-06-2016 at 04:10 IST