|| भक्ती बिसुरे
रशिया, युएई बरोबर इंडोनेशियातूनही ‘हिट्स’
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणे आणि त्यासाठी मराठी भाषेला समृद्ध करणे, या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या व मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे शाखेकडून चालवल्या जाणाऱ्या ‘मराठी विज्ञान परिषद पुणे’ या ब्लॉगला सर्वाधिक प्रतिसाद अमेरिकेतून मिळत असल्याचे चित्र समोर आले आहे.
मराठी विज्ञान परिषद या संस्थेच्या पुणे शाखेमार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांपैकी ‘मराठी विज्ञान परिषद पुणे’ हा ब्लॉगचा उपक्रम लोकप्रिय ठरत आहे. अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळांतर्फे तेथे स्थायिक झालेल्या मराठी कुटुंबातील मुलांसाठी ‘वीकेंड स्कूल’ हा मराठी भाषेची ओळख करुन देणारा उपक्रम चालवला जातो. त्या उपक्रमासाठी ‘मराठी विज्ञान परिषद पुणे’ हा ब्लॉग उपयुक्त ठरत असल्याचे शिकागो येथील महाराष्ट्र मंडळाकडून सांगण्यात आले आहे. अमेरिकेबरोबर युएई, रशिया, इंडोनेशिया येथील वाचकही नियमितपणे या ब्लॉगला भेट देतात.
विनय र. र. म्हणाले,‘ मराठी विज्ञान परिषदेचे उपक्रम अनेकदा मुंबई, पुणे या शहरामध्ये होतात. त्यांचा उपयोग केवळ येथे राहणाऱ्या नागरिकांना होतो, मात्र इतरांनाही तो व्हावा यासाठी ‘मराठी विज्ञान परिषद पुणे’ या ब्लॉगची सुरवात करण्यात आली. विज्ञानाच्या क्षेत्रात होणारी नवनवीन संशोधने आणि संशोधनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखतींमधून त्यांचे संशोधन वाचकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली. विज्ञान कथा, कविता, गाणी, एकांकिका, विज्ञान विषयक व्यंगचित्रं असे साहित्यही या ब्लॉगवर उपलब्ध करुन देण्यात आले. विज्ञान स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. सध्या दिवसाला सुमारे १००० वाचक ब्लॉगला भेट देतात.’
या ब्लॉगची सुरवात २०१६ मध्ये झाली. विनय र. र., डॉ. केदार, डॉ. विद्याधर बोरकर, संजय मा. क. हे या ब्लॉगसाठी कार्यरत आहेत. विनय र. र. पुढे म्हणाले,की परदेशातून मिळणारा प्रतिसाद भारावून टाकणारा आहे. हा प्रतिसाद पाहून विविध देशांमध्ये कार्यरत असलेल्या महाराष्ट्र मंडळांना आम्ही ब्लॉगची माहिती पाठवली. ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचताच सकारात्मक प्रतिसाद मिळालाच, शिवाय पुन्हा एकदा ‘हिट्स’मध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. हा ब्लॉग दृकश्राव्य स्वरुपात आणण्यासाठीही मराठी विज्ञान परिषद पुणे प्रयत्नशील आहे.
‘प्रकल्पांना’ मोठा प्रतिसाद
शाळेतील शिक्षणाचा अविभाज्य भाग म्हणजे प्रकल्प! वेगवेगळ्या विषयांवर आधारलेले, साधे सोपे आणि माहितीपूर्ण प्रकल्प करणे मुलांची आणि त्यापेक्षा त्यांच्या पालकांची कसोटी पाहणारे असतात. ‘मराठी विज्ञान परिषद पुणे’ या ब्लॉगवर ‘प्रकल्प हवेत? हे घ्या!’ अशा नावाचा लेख प्रकाशित करण्यात आला आहे. या लेखाला भेट देणाऱ्या वाचकांची संख्या सर्वात अधिक असल्याचे निरीक्षण विनय र. र. यांनी नोंदवले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 29, 2018 2:32 am