18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

मराठी शुद्धलेखनाचे पहिले अ‍ॅप विकसित

व्याकरणतज्ज्ञ अरुण फडके यांचा पुढाकार

प्रतिनिधी, पुणे | Updated: June 19, 2017 4:37 AM

व्याकरणतज्ज्ञ अरुण फडके यांचा पुढाकार

भाषेची शुद्धता आणि नेमकेपणा हा विचार हळूहळू मागे पडत असताना, ज्यांना खरोखरच शुद्ध प्रमाण भाषेत लेखन करायचे आहे आणि शब्दांचा वापर समजून-उमजून करायचा आहे, अशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मराठी शुद्धलेखन या विषयात गेली अनेक वष्रे काम करणारे व्याकरणतज्ज्ञ अरुण फडके यांनी ‘शुद्धलेखन ठेवा खिशात’ हे शुद्धलेखन या विषयावरील पहिले मोबाइल अ‍ॅप सादर केले आहे. पुण्यातील ‘मॉडय़ुलर इन्फोटेक’ या सॉफ्टवेअर कंपनीने ते विकसित केले आहे.

‘शुद्धलेखन ठेवा खिशात’ या अ‍ॅपमध्ये तब्बल ११ हजार मराठी शब्दांची माहिती दिली आहे. ऱ्हस्व किंवा दीर्घ, विसर्ग असणे किंवा नसणे, स्र किंवा स्त्र, त्याचप्रमाणे लेखनसाम्य असले, तरी अर्थभिन्नता असणे, योग्य पर्यायी लेखन असणे, अशा अनेक प्रकारच्या शब्दांसाठी ह्या अ‍ॅपमध्ये तऱ्हेतऱ्हेचे ठळक निर्देश दाखवले आहेत. मूळ रूपाला विकार होताना बदलणारे ऱ्हस्व-दीर्घ दाखवले आहेत. काही शब्दांमध्ये लागोपाठ येणाऱ्या विशिष्ट व्यंजनांचा उच्चार करताना तो उच्चार शब्दात त्या व्यंजनांचे जणू काही जोडाक्षर असल्याप्रमाणे होणे (सुसकारा, सरदी), शब्दात प्रत्यक्षात नसलेले द्वित्व किंवा नसलेला विसर्ग उच्चारात ऐकायला येणे (काव्य, हत्या, अंधकार, घनश्याम), शब्दात नसलेल्या वर्णाचा उच्चार ऐकायला येणे (संरक्षण, सिंह), शब्दात असलेल्या उकाराचा उच्चारात लोप होणे (सुरुवात, गुरुवार), शब्दात नसलेला औ-कार उच्चारात ऐकायला येणे (लवकर); या सर्व प्रक्रिया भाषेच्या बाबतीत सहज घडणाऱ्या आहेत. अशा सर्व प्रक्रियांमुळे आणि एकंदरीत भाषाशास्त्रानुसार योग्य आणि अयोग्य शब्दांचे लेखन या अ‍ॅपमध्ये दाखवले आहे.

या अ‍ॅपबाबत माहिती देताना फडके म्हणाले, ‘कोशात वापरलेल्या संक्षेपांचे आणि खुणांचे अर्थ’ आणि ‘कोश कसा पाहावा’ या दोन गोष्टी वापरकर्त्यांनी नीट पाहून घेतल्या, तर या अ‍ॅपचा वापर करणे सहजसुलभ होईल. हवा असलेला शब्द शोधण्यासाठी वर्णमाला किंवा बाराखडी पाठ असणे गरजेचे नाही. वरच्या पट्टीत तुम्ही तुमचा शब्द लिहायला सुरुवात करताच त्यानुसार खाली त्या अनुषंगाने शब्द यायला सुरुवात होईल आणि काही सेकंदांतच तुमचा शब्द योग्य-अयोग्य , सामान्यरूपे असल्यास इतर काही टीप, अर्थभेद, स्पष्टीकरण अशा आवश्यक त्या बाबींसह समोर येईल. अ‍ॅपने दाखवलेल्या योग्य-अयोग्य लेखनाबद्दल तुम्हाला काही शंका असेल, तर शेजारी ‘स्पष्टीकरण’ या दुव्यावर जाऊन तुम्ही त्या शब्दाच्या योग्य लेखनाचे शास्त्रीय स्पष्टीकरण पाहू शकता. शेकडो शब्दांची अशी स्पष्टीकरणे दिली आहेत. मराठी भाषेच्या व्याकरणाबद्दल असलेले सरकारचे नियम आणि प्रचलित व्याकरण यानुसार या अ‍ॅपमधील शब्द दिले आहेत आणि ते युनिकोडवर आधारित आहेत.

व्याकरण शिकू इच्छिणाऱ्यांना फडके यांनी लिहिलेल्या ‘मराठी लेखन कोश,’ ‘शुद्धलेखन मार्गप्रदीप,’ ‘शुद्धलेखन ठेवा खिशात’ अशा पुस्तकांचा उपयोग आतापर्यंत होत होता. मात्र, आता तंत्रज्ञानाचा उपयोग करून मराठी शुद्धलेखनाचे अ‍ॅप विकसित झाल्याने भाषा शिकू इच्छिणाऱ्यांना आणि अचूक लिहू इच्छिणाऱ्यांना खूप मदत होणार आहे.

अ‍ॅपवर कसे जायचे

‘शुद्धलेखन ठेवा खिशात’ हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. त्यापैकी ‘फ्री अ‍ॅप’वर एक हजार शब्द देण्यात आले आहेत. तर, शंभर रुपये नाममात्र शुल्क असलेल्या अ‍ॅपवर ११ हजार मराठी शब्द उपलब्ध आहेत.

 

 

 

 

 

First Published on June 19, 2017 4:37 am

Web Title: marathi spell checker app