साहित्य संमेलनाध्यक्षपद निवडणुकीसाठी मराठवाडय़ामध्ये पाठविण्यात आलेल्या मतपत्रिका गेल्या कोठे, असा प्रश्न चक्क निवडणूक निर्णय अधिकाऱ्यालाच पडला आहे. अपुरे पत्ते असल्याची मतदारांची यादी हा प्रश्न भेडसावत असल्याने सलग तीन वर्षे मराठवाडय़ातील मतदारांना दुबार मतपत्रिका पाठविण्याची वेळ आली असल्याचे चित्र आहे. यामध्ये माजी संमेलनाध्यक्ष डॉ. यु. म. पठाण यांचाही समावेश आहे.
पिंपरी-चिंचवड येथे ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १५ ते १७ जानेवारी या कालावधीत होत आहे. ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ, लेखक डॉ. शरणकुमार लिंबाळे, लेखक-प्रकाशक अरुण जाखडे आणि श्रीनिवास वारुंजीकर यांच्यामध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. यासाठी १ हजार ७० मतदारांना मतपत्रिका रवाना करून ३५ दिवस झाले आहेत. मात्र, मराठवाडा साहित्य परिषदेच्या यादीमध्ये असलेल्या अपुऱ्या पत्त्यांमुळे अनेक मतदारांना मतपत्रिका पोहोचू शकलेल्या नाहीत. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर यांना आतापर्यंत १४० दुबार मतपत्रिका पाठवाव्या लागल्या आहेत.
आडकर म्हणाले, मराठवाडा साहित्य परिषदेच्या यादीमध्ये मतदारांचे पत्ते अपुरे आहेत. त्यामुळे अनेक मतदारांना मतपत्रिका मिळालेल्या नाहीत. यामध्ये माजी संमेलनाध्यक्ष डॉ. यु. म. पठाण यांचाही समावेश आहे. मतदारांनी ई-मेल, एसएमएस किंवा व्हॉट्स अॅप यापैकी कोणत्याही माध्यमाद्वारे विनंती केल्यानंतर त्यांच्या पूर्ण पत्त्यावर मतपत्रिका रवाना करण्यात आल्या आहेत. मराठवाडय़ामध्ये ६६ मतदारांना दुसऱ्यांदा मतपत्रिका पाठवावी लागली आहे. मागील दोन वर्षे देखील ५० हून अधिक मतपत्रिका दुबार द्याव्या लागल्या होत्या. मतदार यादीमध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवूनही मतदारांना मिळत नसतील, तर मतपत्रिका जातात कुठे याचा शोध साहित्य महामंडळाने घ्यावा. मात्र, मतदारांचा अपुरा पत्ता आणि पिनकोडचा अभाव ही समस्या केवळ मराठवाडा साहित्य परिषदेपुरतीच मर्यादित आहे.