मध्य महाराष्ट्र व कर्नाटक दरम्यान हवेच्या वरच्या भागात निर्माण झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात रविवारी काही भागात गारपिटी व मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे फळबाग व आंब्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे. येत्या दोन दिवसांत सुद्धा या भागात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी गारपिटीसह वादळी पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी फळबागाचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी मराठवाडय़ातील बहुतांश ठिकाणी, विदर्भात व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपिटीसह वादळी स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पाऱ्याने चाळिशी ओलांडली होती. पण, वादळी पावसामुळे वाढलेल्या तापमानात किंचित घट झाली असून तापमान चाळीश अंशांच्या खाली आले आहे. त्यामुळे उकाडय़ापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. येत्या दोन दिवसांत मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात गारांसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे व परिसरात देखील रविवारी ढगाळ वातावरण होते. दुपारी चांगलाच उकाडा जाणवत होता. पुणे परिसरातही येत्या चोवीस तासांत वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे

देशभरात अवकाळीची शक्यता
*राजस्थानच्या पश्चिम भागात निर्माण झालेला कमी दाबाचा
पट्टा पूर्व भागात सरकला आहे. त्याच वेळी ईशान्य भारतात
आसाम – मेघालयापासून छत्तीसगढच्या दक्षिणेपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
*या परिस्थितीमुळे पावसाच्या सरी पडत असून पंजाब, हरयाणा, चंदीगढ, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडीसा, तेलंगणा, रायलसीमा आणि उत्तर कर्नाटकात जोरदार वाऱ्यांसह ढगांच्या गडगडाटात पावसाच्या सरी आल्या.
*सोमवारी कर्नाटक वगळता इतरत्र हीच स्थिती कायम राहणार असून मंगळवारी विदर्भ, पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश यांच्यासह सिक्कीम येथे पावसाचा अंदाज आहे. बुधवारपासून हवामानाची स्थिती पूर्वपदावर येईल, अशी शक्यता केंद्रीय वेधशाळेने वर्तवली आहे.