भारतीय ऋतुचक्रानुसार मार्चपासून उन्हाळ्याचा हंगाम सुरू होत असतानाच महाराष्ट्रासह देशातही उन्हाचा चटका वाढला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळ नोंदविण्यात येत आहे. पुढील पाच दिवस तापमानातील वाढ कायम राहणार असली, तरी या काळात देशात कुठेही उष्णतेच्या लाटेची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्या राज्यात सर्वत्र कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशाची स्थिती आहे. उत्तरेकडील राज्य आणि हिमालयाच्या विभागातही कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ३ ते ७ अंशांनी वाढ झाली आहे. परिणामी राज्यातही दिवसाच्या कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. सकाळी दहा ते अकरा वाजल्यापासूनच उन्हाचा तीव्र चटका जाणवतो आहे. त्यामुळे वातानुकूलित यंत्रणा आणि पंख्यांचा वापर वाढला आहे.

तापभान..

देशात विविध भागात कमाल तापमानाचा पारा ३५ ते ३९ अंश सेल्सिअसवर गेला आहे. त्यात महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओडिसा, छत्तीसगड, तमिळनाडू, राजस्थान आदी राज्यांचा समावेश आहे.

विदर्भात उच्चांकी तापमान

विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ४ मार्चला ३९.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान या दिवशीचे राज्यातीलच नव्हे, तर देशातील उच्चांकी तापमान ठरले. शुक्रवारी विदर्भातीलच चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३९.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. अकोला येथे ३९.१ अंश सेल्सिअस, तर ब्रह्मपुरी येथे ३८.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.’

राज्यस्थिती..  मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वरवगळता इतर सर्वत्र कमाल तापमान ३४ ते ३८ अंशांवर आहे. पुणे, जळगाव, नाशिक, सांगली, सोलापूर येथे उन्हाचा चटका अधिक आहे. कोकण विभागात मुंबई परिसरासह अलिबाग भागातील कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा अधिक आहे. मराठवाडय़ात औरंगाबाद, परभणीतील दिवसाचे तापमान ३६ ते ३७ अंशांदरम्यान आहे. विदर्भातही तापमानाचा पारा वाढत असून, या ठिकाणी अनेक भागांतील कमाल तापमान ४० अंशांजवळ पोहोचले आहे.