कामावर असलेल्या निवासी डॉक्टरला मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला अटक झाल्यानंतरही पुण्यातील ससून रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आपले काम बंद आंदोलन मागे घेतलेले नाही. तीन निवासी डॉक्टर आणि एका सुरक्षा कर्मचाऱ्यांवर पोलीसांनी विनाकारण दाखल केलेले गुन्हे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत काम बंद आंदोलन मागे घेणार नसल्याचे मार्डच्या पुण्यातील डॉक्टरांनी सांगितले.
ससून रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला पोलीस कर्मचारी श्रीकृष्ण खोकले यांनी बुधवारी रात्री मारहाण केली. डॉक्टरचा धक्का लागल्यामुळे चिडून पोलीसाने मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे मार्डच्या डॉक्टरांनी गुरुवारी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले. या घटनेनंतर पोलीस आयुक्तांनी खोकले यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर त्यांना अटकही करण्यात आली. मात्र, घटना घडली त्यावेळी ती पाहणाऱ्या आणि साक्ष द्यायला गेलेल्या तीन डॉक्टर आणि एका सुरक्षारक्षकावर पोलीसांनी गुन्हे दाखल केल्याचा आरोप मार्डच्या डॉक्टरांनी केला आहे. त्यामुळे हे गुन्हे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा डॉक्टरांनी घेतला आहे. दरम्यान, या आंदोलनामुळे ससून रुग्णालयातील रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे.