पुणे : दसऱ्यानिमित्त घाऊक फूल बाजारात बुधवारी झेंडूची मोठी आवक झाली. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार झेंडूला प्रतिकिलो ५० ते ६० रुपये भाव मिळत असून किरकोळ बाजारात झेंडूची विक्री प्रतिकिलो ८० ते १२० रुपये दराने होत आहे. झेंडू तसेच आपटय़ाच्या पानांच्या खरेदीसाठी मंडईसह शहराच्या अनेक भागात बुधवारी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

पुणे जिल्हा, उस्मानाबाद, अहमदनगर, सातारा, वाई, सोलापूर भागातून मार्केट यार्डातील घाऊक फूल बाजारात झेंडूची आवक झाली. यंदा झेंडू उत्पादक शेतकऱ्यांची लागवडीची वेळ चुकली होती. त्यामुळे यंदा गणेशोत्सवात झेंडूला चांगले दर मिळाले नव्हते. परिणामी शेतकरी निराश झाले होते. नवरात्रोत्सव सुरू झाल्यानंतर फुलांच्या मागणीत वाढ झाली असून मार्केट यार्डातील फूल बाजारात बुधवारी झेंडू खरेदीसाठी पहाटेपासून गर्दी झाली होती. झेंडूसह अन्य फुलांना चांगली मागणी असल्याची माहिती फूल बाजारातील प्रमुख विक्रेते सागर भोसले यांनी दिली.

मार्केट यार्डातील फूल बाजारात दसऱ्यानिमित्त राज्याच्या वेगवेगळय़ा भागांतून झेंडूची आवक झाली. साध्या झेंडूच्या तुलनेत कोलकाता जातीच्या झेंडूला अधिक मागणी राहिली. या जातीच्या झेंडूची पुणे जिल्हय़ात लागवड केली जाते. आकर्षक रंग आणि आकाराने मोठय़ा असलेल्या कोलकाता झेंडूचा वापर तोरणासाठी तसेच सजावटीसाठी केला जातो. झेंडूसह शेवंती, गुलछडी, लीली, गुलाब गड्डीला मागणी चांगली असल्याचे भोसले यांनी सांगितले.

झेंडूसह अन्य फुलांच्या खरेदीसाठी मंडई, बाबू गेनू चौक, नेहरू चौक भागात बुधवारी गर्दी झाली होती. आपटय़ाच्या पानांना चांगली मागणी राहिली.

जुई प्रतिकिलो १७०० रुपये

दसऱ्यानिमित्त शहरातील फूल विक्रेते तसेच हार तयार करणाऱ्या कारागिरांकडून फुलांना मोठी मागणी राहिली. जुई, चमेली, कागडय़ाच्या फुलांना चांगली मागणी राहिली. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने एक किलो जुईला १७०० रुपये असा दर मिळाला. जुईला मिळालेला हा दर उच्चांकी आहे. मार्केट यार्डातील फूल बाजारात जुईची आवक अतिशय कमी प्रमाणात होत आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने दर तेजीत आहेत.

झेंडूचा प्रतिकिलोचा दर

’ किरकोळ बाजार- ८० ते १२० रुपये

’ घाऊक बाजार- ५० ते ६० रुपये