पुण्यातील बाजारात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत दागिने, वाहने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंना चांगला उठाव आहे. बाजारात उत्साह असल्यामुळे दसरा ते दिवाळीच्या दरम्यान या गोष्टींच्या विक्रीमध्ये चांगली वाढ अपेक्षित असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
वाहनांच्या बाजारात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत चांगली स्थिती आहे. याबाबत ‘क्रिस्टल होंडा’चे सचांलक कौशक कोठारी यांनी सांगितले, की काही ब्रँडच्या वाहनांची चांगली विक्री होत आहे, काहींची तुलनेने कमी आहे. मात्र, एकूण विचार करता वाहनांच्या बाजारात यंदा दहा टक्क्य़ांची वाढ आहे. आमच्या अपेक्षांच्या तुलनेत ही वाढ कमी असली, तरी एकूण बाजारात उत्साह असल्याने पुढचा काळ चांगला असण्याची आशा आहे.’’
यंदा सोने-चांदीच्या बाजारालाही चांगले दिवस आले असल्याचे सोने बाजारातून सांगण्यात आले. ‘पीएनजी’चे अजित गाडगीळ म्हणाले, मागील वर्षीपेक्षा यंदाच्या दसऱ्यात सोने खरेदीचे प्रमाण वाढले आहे. कमी वजनाच्या व शुद्ध सोन्याच्या दागिन्यांना चांगली मागणी आहे. मागील वर्षी सोन्याच्या किमती तोळ्याला ३० ते ३१ हजार रुपयांपर्यंत गेल्या होत्या, तर चांदीची किलोची किंमत ५० हजारांपर्यंत गेली होती. सोन्याचा दर २७ हजारांच्या आसपास आल्याने खरेदी वाढली आहे. रांका ज्वेलर्सचे शैलेश रांका म्हणाले, सोन्याचा भाव कमी झाल्याने निश्चितच मागील वर्षांच्या तुलनेत यंदा खरेदी वाढली आहे. चांदीचा बाजारही चांगला आहे. दिवाळी व त्यानंतर लग्नसराईचे दिवस असल्याने ही मागणी कायम राहील.
इलेक्ट्रॉनिक बाजारातही तुलनेने चांगली स्थिती आहे. सलग सुटय़ांमुळे लोक बाहेरगावी गेल्यामुळे आणि महिनाअखेर असल्यामुळे नवरात्रीत विशेष विक्री नव्हती. मात्र, बाजाराचा मूड चांगला आहे. त्यामुळे टीव्ही, फ्रीज, म्युझिक सिस्टीम व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दिवाळीपर्यंत चांगली विक्री अपेक्षित आहे, असे हंस इलेक्ट्रॉनिक्सचे अशोक रांका यांनी सांगितले.