जेजुरी येथे दसऱ्याचा पारंपरिक उत्सव मंगळवारपासून सुरू झाला. खंडेनवमी व दसरा या सणासाठी झेंडू मोठय़ा प्रमाणात लागत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून जेजुरी येथील बाजारात पुणे, मुंबई, कोकण या भागातील व्यापाऱ्यांनी झेंडू खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली. दुष्काळामुळे बाजारात झेंडूची आवक अत्यंत कमी झाल्याने भाव कडाडले. व्यापाऱ्यांनी तो ५० ते ७० रुपये किलोने खरेदी केला. यामुळे शेतकऱ्यांनी चेहऱ्यावर आनंद उमटला.
खंडेनवमीला कारखान्यातील पूजेसाठी मोठय़ा प्रमाणात झेंडू लागतो. पुरंदर तालुक्यात कऱ्हा नदीच्या काठावर तसेच, जिल्ह्य़ात इतरही भागात पूर्वीपासून झेंडूचे पीक घेतले जाते. परंतु, यंदा रोपे लागणीसाठी सुद्धा पुरेसे पाणी नसल्याने तालुक्यात शेतकरी झेंडू लावू शकले नाहीत. अनेक शेतकऱ्यांनी रोपांना तांब्याने पाणी घालून, ठिबक सिंचन करून झेंडू जगवला. शेतकऱ्यांनी आपला माल चारचाकी, दुचाकी व सायकलवरून विक्रीस आणला होता. पूर्वी पुरंदर तालुक्यात गोंडा या झेंडूच्या जातीची लागवड मोठय़ा प्रमाणात व्हायची परंतु आता कोलकाता व इतर नवीन संशोधित जातींच्या झेंडूची लागवड महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात केली जाते ही फुले जास्त दिवस टिकतात. जेजुरीचा बाजार अपेक्षेप्रमाणे भरला नाही. या परिसरातील शेतकरी दसरा-दिवाळीला हक्काचे पसे मिळवून देणारे पीक म्हणून झेंडूची लागवड करतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांच्या माळा घराघरावर बांधल्या जातात. तसेच कारखान्यांमध्ये खंडेनवमीला केल्या जाणाऱ्या पूजेसाठी झेंडू लागतो. म्हणून आजच्या बाजारात झेंडूने मोठा भाव खाल्ला. जादा भावाने झेंडूची फुले खरेदी करावी लागल्याने व्यापारी मात्र नाराज झाल्याचे दिसत होते.