मार्केटयार्डातील व्यवहार सुरळीत; व्यापाऱ्यांना दिलासा

पुणे : शहरातील उपाहारगृहे, खानावळी तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सोमवारपासून व्यवसाय करण्यास मुभा देण्यात आल्यानंतर मार्केटयार्डातील गूळ-भुसार बाजार तसेच भाजीपाला बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली. घाऊक बाजारातील व्यवहार पूर्वपदावर येत असल्याने व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले.

शहरातील उपाहारगृहांत, खानावळीत ग्राहकांना खाद्यपदार्थाचे सेवन करण्याची मुभा सोमवारपासून देण्यात आली आहे. उपाहारगृहे पन्नास टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील उपाहारगृह चालकांसह भुसार बाजारातील व्यापारी तसेच मार्केटयार्डातील अडत्यांनी समाधान व्यक्त केले. उपाहारगृहे सुरू झाल्याने फळभाज्यांच्या मागणीत वाढ झाली. उपाहारगृहे, खानावळीवर निर्बंध असल्याने मध्यंतरी फळभाज्यांसह भुसार मालाच्या विक्रीत घट झाली होती. फळभाज्यांच्या दरात फारशी वाढ झाली नव्हती. उपाहारगृहे सुरू झाल्यानंतर फळभाज्यांच्या दरात वाढ झाल्याची माहिती अडत्यांनी दिली.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते  संघटनेचे अध्यक्ष विलास भुजबळ म्हणाले, ‘उपाहारगृहे, खानावळी बंद असल्याने त्याचा परिणाम  फळभाजी विक्रीवर झाला होता. फळभाज्या नाशवंत असतात. मागणी नसल्याने फळभाज्या खराब होत होत्या. त्यामुळे शेतकरी  आणि अडत्यांचे नुकसान होत होते.

भुसार बाजारात वर्दळ

उपाहारगृहे सुरू झाल्याने अन्नधान्याच्या मागणीत वाढ झाली आहे. भुसार बाजारातील व्यवहार पूर्वपदावर येत असल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. नियमावलीचे पालन करून सर्व व्यवहार पार पाडण्यात येत आहेत, असे भुसार बाजारातील व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या दी पूना र्मचट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले.

फळभाज्यांना उपाहारगृह चालकांकडून मोठी मागणी असते. गेले दोन महिने निर्बंध होते. त्यामुळे घाऊक बाजारात फळभाज्यांना विशेष  मागणी नव्हती. विवाहसमारंभातील उपस्थितीवर निर्बंध होते. त्यामुळे केटरिंग व्यावसायिकांकडून मागणी कमी झाली होती. मागणीअभावी फळभाज्या खराब होत असल्याने शेतक ऱ्यांसह अडत्यांचे नुकसान होत होते.

– विलास भुजबळ, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड