News Flash

बाजारभेट : व्यवसायाबरोबरच श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक भान!

कालमानानुसार अनेक क्षेत्रांमध्ये बदल होत असतात. धान्य व्यापाराने देखील ते अनुभवले आहेत.

पुण्यातील धान्य व्यापार, सद्य:स्थितीतील घाऊक बाजाराचा विचार करताना मार्केट यार्ड येथे केंद्रित झाला आहे. शहराची लोकसंख्या चाळीस लाखापुढे गेली असता दरडोई, दररोज ३०० ग्रॅम धान्याची गरज लक्षात घेता दरमहा सर्व प्रकारच्या धान्याच्या खपाचा आकडा सुमारे तीन कोटी साठ लाख किलो होतो.  मार्केट यार्डमधील घाऊक धान्य व्यापारी पेढय़ांची संख्या सुमारे ३०० आहे. शहरात इतरत्र विखुरलेल्या किरकोळ व्यापाऱ्यांची संख्या तीन हजाराहून अधिक आहे.

मार्केट यार्ड परिसरात प्रवेशद्वार क्रमांक १ ते ६ या अंतर्गत परिसरात सहाशेपेक्षा अधिक दुकाने, पेढय़ा आहेत. गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ याबरोबर साखर, गूळ, मिरची, मसाले, तेल, तूप, सुका मेवा, नारळ, साबूदाणा, आटा, रवा, कडधान्ये, डाळी तसेच पशुखाद्यदेखील येथे उपलब्ध आहे. गूळ, बाजरी, ज्वारी, मका, हरभरा हे मुख्यत: महाराष्ट्रातूनच येतात. इतर धान्य हे मध्य प्रदेश (गहू), राजस्थान (धना मटकी), तामिळनाडू (साबूदाणा, नारळ, तांदूळ), पंजाब, उत्तर प्रदेश (बासमती) ही प्रमुख पुरवठादार राज्ये आहेत. आंध्र-कर्नाटकमधून होणारी आवकदेखील मोठी आहे.

धान्याच्या घाऊक बाजाराचा वेध घेत असताना थोडे इतिहासात डोकावणे रंजक ठरेल. पूर्व काळापासून नाना, भवानी, गणेश या पेठांमध्ये धान्याचा घाऊक व्यापार चालत होता. भवानी पेठ (१७६७), नाना पेठ (१७९०) आणि गणेश पेठ (१७५३) या पेठा पेशवाई काळात, नियोजनबद्धतेने वसल्या होत्या. शहर विकासाबरोबर नागरी वस्तीची वाढ, अरुंद रस्ते, वाढते व्यवहार यामुळे बाजारपेठ स्थलांतराचा विचार १९६०च्या दशकानंतर सुरू झाला. त्या काळी या परिसरात घाऊक व्यापाराची सुमारे दीडशे दुकाने होती. जुन्याजाणत्या व्यापारी पेढय़ांपैकी, चिमणलाल गोविंददास, मोतीजी वीरचंद, भिकमदास किसनदास, गौतमचंद सेठिया, त्र्यंबकलाल केशवजी, देवीचंद मुलतानचंद, पी. व्ही. गोरे, देवीचंद उत्तमचंद, दामोदर वीरदीचंद, जयराज आणि कंपनी या पेढय़ांचा उल्लेख आवश्यक ठरतो. मध्यवर्ती पेठांमधील हा व्यापार १९७६ ते १९७९ या काळात मार्केट यार्ड येथे स्थलांतरित झाला आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियंत्रण आले. सुमारे चाळीस वर्षांच्या काळात आता येथील जागादेखील अपुरी पडू लागली आहे, हे वास्तव आहे. व्यापारामध्ये मुख्यत्वे जैन, गुजराथी, माहेश्वरी, अगरवाल, चौधरी या समाजाबरोबर मराठी, सिंधी, मुस्लीम व्यावसायिकदेखील आहेत.

कालमानानुसार अनेक क्षेत्रांमध्ये बदल होत असतात. धान्य व्यापाराने देखील ते अनुभवले आहेत. जे जे उपयुक्त ते ते स्वीकारले आहे. मात्र काही परंपरादेखील जिव्हाळय़ाने जपल्या आहेत. पूर्वी रेल्वे व्ॉगनने माल यायचा, आता हे प्रमाण संपल्यात जमा आहे. शेतकरी घाऊक व्यापाऱ्याकडे थेट माल आणत होते. आता तो त्याच्या गावाकडील मिलकडे माल पाठवतो आणि घाऊक व्यापारी अशा मिल मालकाकडून खरेदी करण्याचे प्रमाण मोठे आहे. पूर्वी बहुतांश व्यवहार हे परस्पर सामंजस्यातून माणुसकीचे संकेत पाळून व्हायचे. आता माणुसकी टिकून आहे, पण त्याला कायद्याचेही बंधन आहे. पूर्वी १००, ५०, ३५ किलोची गोणपाटाची पोती होती, आता पॉलिथीन प्लॅस्टिकच्या ब्रँडेड पॅकिंगचा जमाना आहे. माल तपासणीसाठीचा विशिष्ट टोचा-बंबा, आता कुठेच दिसत नाही. पॅकिंग आता दोन-पाच किलोच्या पिशव्यांमध्ये सुद्धा उपलब्ध असते.

सहकुटुंब हॉटेलमध्ये जाण्याचे आणि ऑनलाइन पार्सल मागवण्याचे प्रमाण वाढते आहे. त्याचा प्रभाव घरगुती किराणाच्या यादीवर निश्चित होत आहे. भूक कालातीत असली तरी मागणी- पुरवठय़ाची क्षेत्रे बदलत आहेत, विस्तारत आहेत हे नाकारून चालणार नाही. काळाची पावले ओळखून बदल घडताहेत, परंतु धान्य व्यापाराच्या क्षेत्रामध्ये पेढीवर संगणक आले तरी पारंपरिक लाल चोपडय़ांच्या पूजेत आजही खंड नाही.

पुण्यातील धान्य व्यापाराचा विचार करताना पुणे र्मचट चेंबर आणि हमाल पंचायत या दोन्ही संस्थांचे योगदान महत्त्वाचे ठरते. व्यापाऱ्यांच्या काही वेगवेगळय़ा संस्था विलीन करून १९४९ मध्ये पुणे र्मचट चेंबर अस्तित्वात आली. इथे कोणतीही धार्मिक सुट्टी नाही, फक्त १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे या अधिकृत सुट्टय़ा आहेत. चेंबरचे संपूर्ण महाराष्ट्रात ५००० पेक्षा अधिक सभासद आहेत. कायदेविषयक जागृती करताना व्हॅटमुक्तीसाठी दिलेला प्रदीर्घ यशस्वी लढा हा संस्थेच्या कारकिर्दीतील मानाचा शिरपेच आहे. आपद्ग्रस्तांना केवळ धनादेशाची मदत न करता पुनर्वसन शिबिरामध्ये प्रत्यक्ष राबणारे कार्यकर्ते पण इथे आहेत. सभासदांच्या पाल्यांबरोबर हमाल, शेतमजुरांच्या पाल्यांनाही गुणगौरवाच्या मदतीच्या उपक्रमात सामावून घेतले जाते. कोणत्याही प्रसंगी वाद, तंटे उद्भवल्यास ते सामोपचार आणि सामंजस्याने सोडवण्यासाठी इथे समन्वय समिती आहे. व्यापाराशी संबंधित घटकांना वैद्यकीय मदत, जरूर तिथे कर्ज दिले जाते. चेंबरच्या वतीने दसरा ते दिवाळी या काळात स्वस्त दरात चिवडा, लाडू विक्री केली जाते. माजी जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या योजनेने दोन लाख किलोच्या विक्रीचा टप्पा पार करून गिनीज बुक आणि लिम्का रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. मानवतेच्या भावनेतून श्रमजीवींच्या कल्याणासाठी सहृदयतेने, सामंजस्याने प्रतिसाद देणारी अशी संस्था अभावानेच पाहायला मिळते. ‘वाणिज्य विश्व’ हे मासिक संस्थेचे मुखपत्र आहे.

धान्य बाजार नाना, भवानी पेठेत असण्याच्या काळात पुण्यात हमाल पंचायतीची स्थापना झाली. कष्टकरी, वंचित आणि तळागाळातल्या माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी आयुष्य पणाला लावणारे बाबा आढाव यांनी १९६२ मध्ये हमाल पंचायत स्थापन केली. १९७४ मध्ये ‘कष्टाची भाकर’ सुरू झाली. तेव्हा ५० पैशात भाकरी योजना पुढे आली. आता भाकरी आठ रुपये झाली असून, रोज दोनशेपेक्षा अधिक कष्टकरी येथील स्वस्त भोजनाचा लाभ घेतात. माथाडी कामगार कायद्याच्या माध्यमातून तसेच परस्पर सामंजस्यातून हमाल पंचायतीने अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. परिस्थितीच्या ओझ्याखाली दबलेल्या हमालांच्या पाठीचा कणा स्वाभिमानाने ताठ ठेवण्याचे कार्य बाबा आढाव आणि बाबा पोकर्णा या दोघांनी आत्मीयतेने केले. अशाच उत्तमोत्तम कार्यामुळे हमाल पंचायतीचे कार्य देशभरात पोचले. त्याबरोबर पुणे र्मचट चेंबरनेसुद्धा जमनालाल बजाज, आयएसओ २०००, लिम्का रेकॉर्ड नोंद असे सन्मान प्राप्त केले आहेत. ‘घाऊक धान्य बाजाराच्या विकासासाठी पुणे र्मचट चेंबरचे योगदान’ या विषयावर डॉ. मधुरा भागवत यांनी पीएच.डी. प्राप्त केली आहे, ही एक बाब पुरेशी बोलकी वाटते.

धान्य बाजाराविषयी तपशीलवार माहिती देण्यासाठी दिलीप रायसोनी (काका), राजेंद्र गुगळे, अजित सेठिया, राजेश शहा यांच्याशी संवाद साधला. प्रत्यक्ष बाजारात भ्रमंती केली. राजेंद्र गुगळे यांचा बाजारपेठेचा अभ्यास कौतुकास्पद आहे. सेठिया यांनी चेंबरच्या उपक्रमांची माहिती दिली. काका रायसोनी यांनी १९७८ साली पाच पैसे प्रतिक्विंटलने दलाली चालू केली. कालांतराने १९८९ साली स्वत:ची दिलीपकुमार झुंबरलाल रायसोनी या नावाने भुसार माल विक्रीची पेढी सुरू केली. आता त्यांची दोन्ही मुले महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात नव्या तंत्रज्ञानासह व्यापार विस्तार करीत आहेत. या मंडळींशी तसेच इतर जाणकारांशी चर्चा करताना व्यावसायिकांच्या समस्या आणि भवितव्यसुद्धा जाणून घेतले. राजेश शहा यांनी धान्याच्या ब्रँडिंगचे महत्त्व ओळखून जयराज आणि कंपनी आणि ग्राहक पेठेच्या सहकार्याने ‘तांदूळ महोत्सव’ सुरू केला. ही संकल्पना घाऊक बाजारामध्ये क्रांतिकारी ठरून अनेकांनी त्याचे अनुकरण केले.

धान्याच्या घाऊक बाजाराच्या भेटीमुळे शेतकरी ते ग्राहक अशा सेवा साखळीची, आर्थिक उलाढालीची, श्रमप्रतिष्ठेची आणि जमा-खर्चाच्या ताळेबंदाबरोबर जपलेल्या सामाजिक जाणिवेचीसुद्धा नव्याने ओळख झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 5:07 am

Web Title: market yard pune grains market
Next Stories
1 उर्से टोलनाक्याजवळ २ कोटी ९० लाखांच्या जुन्या नोटा जप्त
2 पिंपरी-चिंचवडमध्ये चोरांचा धुमाकूळ, पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह
3 ‘त्या’ जागेवर शिवसृष्टी व्हावी, हीच समस्त विरोधकांची इच्छा!
Just Now!
X