विवाहविषयक संकेतस्थळावरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा

विवाहाच्या आमिषाने सिंहगड रस्ता भागातील एका महिलेला ३ लाख ६५ हजार रुपयांचा  गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या बाबत महिलेने सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार अनोळखी व्यक्तीविरोधात माहिती-तंत्रज्ञान कायदा तसेच फसवणूक या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता भागातील एका महिलेने वर्षभरापूर्वी विवाहविषयक संकेतस्थळावर नोंदणी केली होती. त्यानंतर या संकेतस्थळावर एकाने बनावट नाव तसेच छायाचित्र वापरून नोंदणी केलेल्या एकाने महिलेशी संपर्क साधला होता. तिला विवाहाचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ते संपर्कात आले. अज्ञात व्यक्तीने महिलेकडे पैशाची मागणी केली. तिला बँक खात्यात पैसे भरण्याची सूचना केली. महिलेकडून गेल्या वर्षभरात वेळोवेळी ३ लाख ६५ हजार रुपये उकळण्यात आले. त्यानंतर महिलेने अज्ञात व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे निदर्शनास आले.

फसवणूक केल्याप्रकरणी महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कृष्णाजी इंदलकर तपास करत आहेत.