सासरच्या छळाला कंटाळून एका २८ वर्षे वयाच्या विवाहितेने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याची घटना घडली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आसमा शेख (रा. पंचहौद टॉवरजवळ, घोरपडी पेठ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पती ईजाज सलीम शेख, व सासू अजीजा सलीम शेख (दोघे रा. भाऊ परशुराम अपार्टमेंट, पंचहौद टॉवरजवळ, घोरपडी पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसमाचे वडील सिकंदर शेख (वय ६०, रा. घोरपडी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकान वाढविण्याच्या कामासाठी माहेराहून ५० हजार रुपये आणण्याची मागणी आसमाकडे केली जात होती. त्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. या छळाला कंटाळून तिने १९ मार्चला राहत्या घरी विषारी औषध घेतले.
बिलाच्या कारणावरून वेटरला मारहाण
बिलाच्या कारणावरून झालेल्या वादात दोघांनी वेटरला मारहाण करण्याची घटना शनिवारी रात्री शिवाजीनगर भागातील डेक्कन रॉन्देवू हॉटेलमध्ये घडली. मात्र, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये बिलात काही त्रुटी असल्याचे कारण काढून दोन ग्राहकांनी वेटरशी वाद घातला. थोडा वेळ शाब्दिक बाचाबाची झाली व त्यानंतर दोघांनी मारहाण केली.