‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखवणाऱ्या केंद्र सरकारने कामगार व शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे निर्णय घेतले आहेत, असा आरोप आपचे समन्वयक मारुती भापकर यांनी पिंपरीत बोलताना केला. हिंदूुस्तान अॅन्टीबायोटिक्स (एचए) कंपनीतील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावे, अन्यथा केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून खासदार अनिल शिरोळे, शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.
एचए कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ सुरू असलेल्या आंदोलकांसमोर ते बोलत होते. काँग्रेसचे नगरसेवक कैलास कदम, सद्गुरू कदम, अरुण बोऱ्हाडे, अमिना पानसरे, माजी नगरसेवक महंमद पानसरे आदी उपस्थित होते.
या वेळी एचए कामगार संघटनेचे सरचिटणीस सुनील पाटसकर म्हणाले, की नऊ महिन्यांपासून थकलेले वेतन मिळाले पाहिजे. उत्पादन पूर्ववत सुरू झाले पाहिजे. निवृत्त कर्मचाऱ्यांना देणी मिळाली पाहिजे. कारखाना पुनर्वसन प्रस्तावाची तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करू. कैलास कदम म्हणाले, एचए कंपनी सरकारने चालवण्यासाठी घ्यावी, यापूर्वी बेंगलोरला असा प्रयोग केला आहे. एचएचे प्रश्न न सोडवल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे धरू.