चिन्मय पाटणकर

नाटय़ केवळ घटनांमध्येच असते असे नाही. तर हावभाव, हालचाली, वावरण्यातूनही नाटय़ निर्माण करता येते. अशाच मौनातल्या नाटय़ाचा अनुभव ‘मौनांतर’ या नाटय़ स्पर्धेतून घेता येणार आहे.

शब्द न उच्चारता व्यक्त होणं खूप आव्हानात्मक असतं. कारण त्यासाठी चेहरा, शरीर बोलणं महत्त्वाचं असतं. शब्दांच्या पलीकडचे भाव मौनातून मांडणं हे अभिनयातलं महत्त्वाचं अंग, अर्थात मूकनाटय़.. मूकनाटय़ांना प्रोत्साहन देणारी ‘मौनांतर’ ही स्पर्धा ६ आणि ७ जुलैला भरत नाटय़मंदिर येथे होत आहे.

सध्याच्या माध्यमांच्या गदारोळात, आजूबाजूला सतत काही ना काही आवाज होत असताना एकही शब्द न उच्चारता आपली कृती करणं सर्वसामान्यांसाठीही जरा कठीणच जातं. अशा या गोंगाटाच्या वातावरणात मूकनाटय़ वेगळं ठरतं. वास्तविक मूकनाटय़ाला मोठी परंपरा आहे. चार्ली चॅप्लिनसारखा पूजनीय अभिनेताही याच मूकनाटय़ाच्या परंपरेतला.. मात्र, काळाच्या ओघात मूकनाटय़ बाजूला पडलं आणि केवळ नाटक टिकून राहिलं. मूकनाटय़ाची ही परंपरा नव्या काळातही रूजवण्यासाठी ड्रीम्स टू रिअ‍ॅलिटी, वाईड विंग्ज मीडिया आणि फेअरी टेल मीडिया स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने मौनांतर ही स्पर्धा गेली सहा र्वष आयोजित करण्यात येते. पुणे आणि मुंबई अशा दोन केंद्रांवर स्पर्धा होते. त्यात ४ जुलैला मुंबई केंद्रावरील स्पर्धेत चार संघांचा सहभाग आहे, तर पुणे केंद्रावर १६ संघांचे सादरीकरण होणार आहे.

पुणे केंद्रावरील स्पर्धेत रॅबिट होल, ऑन पिरियड, गवाह, सॉलिड बाईंड, लुकाछुपी, द ब्लॅक क्लॉन, पोट्र्रेट मोड, शतपावली अशा नाटकांचा समावेश आहे. या मूकनाटय़ांतूनही विषयांचे, मांडणीचे वैविध्य दिसून येते. स्पर्धेचं पारितोषिक वितरण १३ जुलैला होणार आहे. ‘मूकनाटय़ हा खूप महत्त्वाचा प्रकार आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत त्याकडे काहीसे दुर्लक्ष झाले होते. मात्र, मौनांतर या स्पर्धेनंतर आता त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जाऊ लागले आहे. मूकनाटय़ाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असल्याचे जाणवत आहे.  मूकनाटय़ हे केवळ सादरीकरणासाठीचे आव्हान नाही, तर विचारप्रक्रियाही वेगळ्या पद्धतीने करावी लागते.

हा फरक आता लक्षात येऊ लागला आहे. त्यामुळे स्पर्धेच्या प्रतिसादात सकारात्मक बदल होताना दिसत आहे. येत्या काळातही मूकनाटय़ाचं वेगळं अस्तित्व निर्माण व्हावं ही अपेक्षा आहे,’ असं आयोजक कुशल खोतनं सांगितलं.