गुलाबांना जपान, हॉलंडमध्ये मोठी मागणी

लोणावळा : जगभरातील युवकांकडून साजरा केल्या जाणाऱ्या ‘व्हेलेंटाईन डे’ अर्थात प्रेमदिनासाठी गुलाब फुलांना मोठी मागणी असते. गेल्या काही वर्षांपासून विविध देशांत ‘व्हेलेंटाईन डे’साठी पुणे जिल्ह्य़ातील मावळ तालुक्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांनी  गुलाबपुष्पांची निर्यात सुरू केली आहे.

व्हेलेंटाईन डे १४ फेब्रुवारी रोजी असून मावळ तालुक्यातील फूल उत्पादक शेतक ऱ्यांनी गुलाब परदेशात पाठविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मावळ तालुक्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून मोठय़ा प्रमाणावर गुलाबांची लागवड करत असून त्यासाठी त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीचा आधार घेतला जात आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील गुलाब फुलांना गेल्या काही वर्षांपासून परदेशातून मागणी वाढली आहे. परदेशात गुलाबफुलांची निर्यात केल्यानंतर उर्वरित गुलाब देशांतर्गत बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविला जातो.

मावळातील टॉप सिक्रेट जातीच्या गुलाबफुलाला परदेशातील बाजारपेठेतून मोठी मागणी आहे. मावळ तालुक्यात साडेसहाशे एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर गुलाबपुष्पांची लागवड केली जाते. त्यासाठी खास हरितगृहे (पॉलिहाऊस)  बांधण्यात आली आहेत. मावळ तालुक्यात लागवड करण्यात आलेला ६० टक्के गुलाब परदेशात पाठविला जातो. यंदा वातावरणातील बदलांमुळे फूल उत्पादनावर काहीसा परिणाम झाला आहे. सध्या थंडीचा कडाका वाढल्याने फुले उमलण्यास काहीसा विलंब होत असल्याचे सांगण्यात आले.

मावळातील गुलाब जपान, हॉलंडमध्ये

मावळातील गुलाब फुलांना जपान तसेच हॉलंड या देशातून मोठी मागणी आहे. टॉप सिक्रेट  (लाल रंग), गोल्डस्ट्राईक (पिवळा), आवलाँच (पांढरा), ट्रॉपिकल अ‍ॅमेझॉन (नारंगी) या जातीच्या गुलाबपुष्पांची लागवड हरितगृहांमध्ये केली जाते. दिल्लीसह, मुंबई, इंदूर, सुरत, अहमदाबाद, बडोदा, जयपूर, लखनौ, जबलपूर, हैद्राबाद, गोवा येथे मोठय़ा प्रमाणावर गुलाबफुले विक्रीसाठी पाठविली जातात. पवना फूल उत्पादक संघ, साई फ्लॉवर्स, सोयक्स फुलोरा, एस्सार अ‍ॅग्रोटेक, सुजल अ‍ॅग्रो, साई रोझेस, प्रबोधन फ्लॉवर्स, रूजल अ‍ॅग्रो, जय अंबे, इंडिका फ्रेश, लेक व्हॅली, समृद्धी, ऑरियन एक्सपोर्ट, ग्लोबल अ‍ॅग्रोटेक, विक्रम ग्रीनटेक आदी कंपन्यांकडून गुलाबाची निर्यात केली जाते.

शास्त्रोक्त पद्धतीने लागवड

मावळ तालुक्यातील फूल उत्पादक शेतकरी वर्षभर गुलाबफुलांचे उत्पादन घेतात. ‘व्हेलेंटाईन डे’साठी गुलाब फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे या कालावधीत गुलाबाचे उत्पादन क से वाढेल, याचे नियोजन डिसेंबर पासून केले जाते. गुलाब फुलांची वाढ, योग्य ती औषध फवारणी, छाटणी याकडे काटेकोरपणे लक्ष दिले जाते. २८ जानेवारी ते १० फेब्रुवारीदरम्यान ही फुले परदेशात पाठविली जातात. पवना फूल उत्पादक संघाच्या माध्यमातून चंद्रकांत कालेकर, ज्ञानेश्वर ठाकर, विश्वनाथ जाधव, मुकुंद ठाकर यांनी एकत्र येऊन हरितगृहातील फुले परदेशात पाठविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. सामूहिक शेतीचा विस्तार करत नव्याने काही क्षेत्रावर हरितगृहे तयार करण्याचे काम सुरू असल्याचे ठाकर यांनी सांगितले. वाघू मोहोळ, सतीश मोहोळ, सचिन मोहोळ, शिवाजी भेगडे यांनी या भागात गुलाब फुलांचे मोठे उत्पादन घेतले आहे.