आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाइनवर येणाऱ्या कॉल्सपैकी सर्वाधिक कॉल्स २१ ते २५ या वयोगटातील तरुणांचेच असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे या हेल्पलाइनवर फोन करणाऱ्यांमध्ये तरुणांच्या खालोखाल १५ ते २० या वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
‘कनेक्टिंग’ या संस्थेतर्फे आत्महत्येचे विचार करणाऱ्यांना त्यापासून परावृत्त करणासाठी हेल्पलाइन चालवली जाते. २००८ साली सुरू झालेल्या या संस्थेचा मंगळवारी सहावा वर्धापनदिन होता. या निमित्ताने संस्थेने सुरुवातीपासून आतापर्यंत हेल्पलाइनवर आलेल्या कॉल्सचा अहवाल प्रसिद्ध केला. यात सर्वाधिक आलेले सर्वाधिक कॉल्स तरुणांकडूनच येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संस्थेचे प्रमुख बॉबी झकारिया, विश्वस्त अर्नवाझ दमानिया, हेल्पलाइनच्या संस्थापक सँडी डायस अँड्राडे आणि स्वयंसेवक शेरिल चक्रनारायण यांनी पत्रकार परिषदेत संस्थेचा अहवाल मांडला.
आतापर्यंत या हेल्पलाइनवर एकूण ९६३३ दूरध्वनी आले आहेत. हे कॉल्स मुख्यत: महाराष्ट्राच्या शहरी तसेच, ग्रामीण भागातून आले आहेत. संस्थेच्या अहवालानुसार दूरध्वनी करून आपल्याला आत्महत्या करावीशी वाटते आहे, असे सांगणाऱ्यांपैकी तब्बल ३२ टक्के जण २१ ते २५ या वयोगटातील आहेत, तर २६ टक्के जण १५ ते २० या वयोगटातील आहेत. विशेष म्हणजे ९ ते १९ या वयोगटातील लोकांना आत्महत्या कराविशी वाटण्याची कारणे अभ्यासाचा ताण आणि प्रेम प्रकरणे हीच आहेत. तर २० ते २९ या वयोगटात प्रेम प्रकरणांबरोबरच कौटुंबिक समस्या हेही आत्महत्येची इच्छा होण्याचे कारण असल्याचे दिसून आले.
२६ ते ३० हा वयोगट आत्महत्येची इच्छा प्रकट करणाऱ्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. हेल्पलाइनला आलेल्या दूरध्वनींध्ये १३ टक्के दूरध्वनी २६ ते ३० या वयोगटातील आहेत. त्याखालोखाल ४१ ते ४५ या वयोगटातील लोकांनी केलेल्या दूरध्वनींची संख्या ११ टक्के आहे. ३१ ते ४९ या वयोगटात मनात आत्महत्येचे विचार येण्याचे प्रमुख कारण कौटुंबिक समस्या आणि मानसिक आजार हे असल्याचे लक्षात आले.
 
हे आहेत हेल्पलाइन क्रमांक- १८००२०९४३५३ (टोल फ्री) आणि ९९२२००११२२
हेल्पलाइनची वेळ- सर्व दिवशी दुपारी २ ते रात्री ८ वाजेपर्यंत.
सार्वजनिक सुट्टय़ांच्या दिवशीही हेल्पलाइन सुरू असते.  

 
आत्महत्या रोखण्यासाठी हवेत स्वयंसेवक
संस्थेने २००८ मध्ये ९ स्वयंसेवकांसह हेल्पलाइन सुरू केली. आता स्वयंसेवकांची संख्या ९० झाली आहे. तरीही संस्थेला स्वयंसेवकांची गरज आहे, असे बॉबी झकारिया यांनी सांगितले. आत्महत्येचे विचार करणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकणारे, त्यावर खुलेपणे विचार करू शकणारे, सल्ले देण्याची घाई न करणारे स्वयंसेवक या हेल्पलाइनसाठी हवे असून व्यक्तीस आत्महत्येपासून परावृत्त करण्याबाबतचे ६० तासांचे विशेष प्रशिक्षण त्यांना संस्थेतर्फे दिले जाते.