पावसाळ्यात दिवसाच्या कोणत्या वेळात जास्त पाऊस पडतो आणि कधी त्याचे प्रमाण कमी असते, या प्रश्नांची उत्तरे हवामानशास्त्रीय अभ्यासाद्वारे सुटली आहेत. महाराष्ट्राबाबत सांगायचे तर जास्त पावसाचा काळ आहे- सायंकाळी ५.३०, तर कमी पावसाचा काळ आहे- सकाळी ८.३० ते ११.३०. याचाच ढोबळ अर्थ असा की, सकाळी कार्यालयात जाताना पाऊस कमी असतो, तर सायंकाळी कार्यालयातून घरी परतताना तो जास्त असतो.
पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) मलय गनई या संशोधकाने हा विशेष अभ्यास केला आहे. त्याद्वारे पावसाची अनेक गुपिते उलगडली आहेत. गनई यांनी गेल्या १० वर्षांतील जून ते सप्टेंबर या काळातील पावसाच्या नोंदींचा अभ्यास केला. त्यातही दर तीन तासांनी पडणाऱ्या पावसाचे विश्लेषण केले. त्यातून विविध भागातील रंजक गोष्टी उघड झाल्या आहेत. ढगांमधील पाण्याची पातळी आणि प्रत्यक्षात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण दिवसाच्या कोणत्या वेळात कसे होते, याचा अभ्यास त्यांनी केला. त्यासाठी महाराष्ट्रासह मध्य भारत, पश्चिम घाट, वायव्य भारत, ईशान्य भारत आणि समुद्रावरील पावसाच्या नोंदींचे पृथ:करण केले.
त्यांच्या अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार, महाराष्ट्रासह मध्य भारतात सकाळी ८.३० ते ११.३० या काळात पावसाचे प्रमाण कमी असते. संपूर्ण पावसाळ्यात या वेळात तासाला सरासरी ०.३ मिलिमीटर इतक्या प्रमाणात पाऊस पडतो. या तुलनेत सायंकाळी ५.३० वाजण्याच्या आसपास पावसाचे प्रमाण तिप्पट असते. या वेळी तासाला ०.९ मिलिमीटर इतका पाऊस पडत असल्याचे गनई यांच्या अभ्यासात पाहायला मिळाले आहे. विशेष म्हणजे, या नोंदीचा संबंध थेट ढगांमधील पाण्याच्या प्रमाणाशी असल्याचे दिसून आले आहे. या भागात दुपारी २.३० च्या सुमारास ढगांमधील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यापाठोपाठ म्हणजे ५.३० च्या आसपास सर्वाधिक पावसाची नोंद होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रासाठी या वेळा असल्या तरी इतर भागांसाठी जास्त पावसाच्या वेळा वेगवेगळय़ा आहेत. ईशान्य भारतात पहाटे २.३० च्या सुमारास सर्वाधिक पाऊस पडतो. बंगालच्या उपसागरावर जास्त पाऊस पडण्याची वेळ सकाळी ११.३० ही आहे, तर पश्चिम घाटात दुपारी २.३० ते ५.३० या काळात सर्वाधिक पाऊ पडत असल्याचे पाहायला मिळाले आहे.

वेगवेगळय़ा भागातील सर्वाधिक पावसाच्या वेळा
महाराष्ट्रासह मध्य भारत-    सायं. ५.३०
बंगालचा उपसागर-        सकाळी ११.३०
पश्चिम घाट-            दुपारी २.३० ते ५.३०
ईशान्य भारत-            पहाटे २.३०