राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून किमान आणि कमाल तापमानामध्ये सातत्याने वाढ नोंदविली जात असल्याने दुपारी उन्हाच्या झळा जाणवत आहेत. पुढील तीन ते चार दिवसांत कमाल तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. सध्या राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानाचा पारा सध्या ३६ ते ३७ अंश सेल्सिअसवर आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात उन्हाच्या झळा तीव्र आहेत.

कोकण विभागामध्ये मुंबईत ३१, तर सांताक्रूझ आणि रत्नागिरीत किमान तापमानाचा पारा ३५.४ अंशांवर आहे. पुढील तीन ते चार दिवसांत रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यतील कमाल तापमान ३५ अंशांवर राहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, जळगाव, कोल्हापूर येथील किमान तापमान ३६ अंशांच्या आसपास, तर मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ३९.२ अंश तापमान नोंदविले गेले. सोलापूरचा पारा ३८.४ अंशांवर पोहोचला आहे. हे तापमान पुढील काही दिवस कायम राहून नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव आदी ठिकाणी तापमानाचा पारा वर जाणार आहे. मराठवाडय़ातील बिड येथे ३८, तर परभणी, नांदेडमध्ये ३७ अंशांवर कमाल तापमानाचा पारा पोहोचला आहे. त्यामुळे तेथे उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत. पुढील काळात मराठवाडय़ात उकाडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. जालना, बीड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यत कमाल तापमान ३८ अंशांपर्यंत जाऊ शकते. विदर्भामध्ये अमरावतीत सर्वाधिक ३८.४ अंश कमाल तापमान आहे.

अकोला, ब्रम्हपुरी, चंद्रपूर, यवतमाळ येथे ३७ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमानाची नोंद होत आहे. त्यात पुढील दिवसांत चढ-उतार होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.