भारत हा देश जगातल्या पहिल्या क्रमांकाची नॉलेज पॉवर होवो ही अशी प्रार्थना आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बाप्पाच्या चरणी केली. पुण्यातली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या १२७ व्या वर्षानिमित्त आज पहिल्याच दिवशी नितीन गडकरी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्याचरणी लीन होत भारत ही जगातली क्रमांक एकची नॉलेज पॉवर होवो हे साकडं घातलं. “ज्ञान ही आपल्या देशातली खूप मोठी शक्ती आहे. इनोव्हेशन, सायन्स टेक्नॉलॉजी या सगळ्यामध्येच भारत अग्रेसर आहे. गणपती ही बुद्धीची देवता आहे त्यामुळे आपला भारत जगातली क्रमांक एकची नॉलेज पॉवर होवो अशी प्रार्थना गणपती चरणी करतो” असं गडकरींनी म्हटलं आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळा च्या १२७ व्या वर्षानिमित्त यंदा श्री गणेश सूर्यमंदिर सजावटीचे आणि मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उदघाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार गिरीश बापट, भाजपा पुणे शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांसह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.