महापालिका आयुक्तांकडे तक्रार

आपल्याला डावलून महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली जात असल्याची तक्रार पिंपरीचे महापौर नितीन काळजे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. यापुढे, आपल्या उपस्थितीतच सर्व निर्णयांची घोषणा करण्यात यावी व तशा सूचना अधिकाऱ्यांना द्याव्यात, अशी मागणी महापौरांनी आयुक्तांकडे केली आहे. या निमित्ताने पदाधिकाऱ्यांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव उघड झाला आहे.

महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी विविध योजना जाहीर केल्या जातात, अनेक निर्णय होतात. राज्य शासन व केंद्र शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनाही शहरवासियांसाठी राबवल्या जातात.

अशा योजना जाहीर करताना संबंधित विभागाचे अधिकारी, विभागप्रमुख आपल्याला माहिती देत नाहीत, परस्पर त्याची घोषणा केली जाते. पंतप्रधान आवास योजना, स्मार्ट सिटी यासारख्या महत्त्वाच्या विषयांची घोषणा थेटपणे करण्यात आली. वास्तविक पाहता शहराच्या महापौरांना याबाबतची पूर्ण माहिती असणे आवश्यक असून त्याची घोषणा महापौरांनी करणे अपेक्षित आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. यापुढे कोणतीही योजना राबवायची झाल्यास, महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा करायची असल्यास त्याची माहिती आपल्याला देण्यात आली पाहिजे.

तसेच, आपल्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत घोषणा व्हायला हवी, असे महापौरांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. या संदर्भात, अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणीही महापौरांनी केली आहे.