पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. स्वतः मोहोळ यांनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे याबाबत माहिती दिली आहे. करोनाविरोधात लढा देताना खुद्द महापौरांना करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.

ट्वीट करुन महापौर मोहोळ यांनी सांगितले की, “थोडासा ताप आल्याने मी करोनाची चाचणी करुन घेतली. ही चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मात्र, माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील.”

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीला लावली होती हजेरी

पुण्यातील विधान भवन येथे काल करोनाच्या परिस्थितीची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, वैद्यकीय शिक्षण आणि अन्न, औषध विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवडचे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, साखर आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनु गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शासनाचे वैद्यकीय सल्लागार, संचालक डॉ. अर्चना पाटील, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी हजेरी लावली होती. बैठकीत अजित पवार यांच्यासह सर्वांमध्ये ठरवून दिलेल्या नियमानुसार अंतर ठेवून बैठक व्यवस्था करण्यात आली होती.

पुणे शहरात करोनाचा प्रादुर्भाव सध्या वाढतच आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्याने शहरात बऱ्यापैकी उद्योग-व्यवसाय सुरु झाले आहेत. लोकांच्या बाहेर फिरण्यावरील निर्बंधही शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळेच शहरात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, शहरातील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेल्या आणि ज्या भागात जास्त प्रमाणात करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत अशा पेठांचा भाग अद्यापही सील करण्यात आला आहे. पुणे शहरात काल दिवसभरात नव्याने ८०७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तर पिंपरीत २७६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. पुण्यातील रुग्णांची संख्या आता १९ हजार ८४९ झाली आहे. तर काल दिवसभरात नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंमुळे पुण्यात आत्तापर्यंत ६८५  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ६१९ जणांची  तब्बेत ठणठणीत असल्याने त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १२ हजार २९० रुग्ण करोना मुक्त झाले आहेत.