महाराष्ट्रात माळरानं आणि काटवनांची संख्या खूपच कमी होऊ लागली आहे. काही माळरानं अगदीच ओसाड असल्यामुळंच वाचली असावीत. काटवनं मात्र लक्षणीयरित्या कमी झाली आहेत. पुण्याजवळचं मयुरेश्वर हे असंच एक काटवन. मात्र, ते देखिल आकुंचन पावू लागलं आहे. या काटवनाची निर्मिती प्रामुख्यानं चिंकारा जातीच्या हरणांसाठी राखून ठेवण्यात आली असली, तरी तिथं तरस, कोल्हा आणि लांडगेही दिसतात. आसपासच्या शेतातून मोर आहेत आणि खास काटवनातले पक्षीही आहेत.
सफर काटवनांतील पक्ष्यांची!
पुण्यापासून सुमारे ९० किलोमीटरवर सुपे गावाजवळ हे काटवन आहे. सोलापूर महामार्गावरील यवतच्या थोडंसं पुढं गेल्यानंतर उजवीकडे एक फाटा फुटतो. त्याशिवाय चौफुल्यावरून आणि दिवे घाटातूनही इथं येता येतं. खेड शिवापूरहूनही इथं येता येतं. दिवे घाटातून जेजुरीला यायचं आणि गावातूनच मोरगावच्या दिशेनं वळायचं. सुपे गावाबाहेरील रस्त्यावरच वनखात्याची कमान दिसते. या कमानीतून थोडं आत गेल्यानंतर वन खात्याचं कार्यालय लागतं. तिथं नोंद करून आणि आत फिरण्यासाठी असलेलं शुल्क भरल्यावर मयुरेश्वर अभयारण्यात फिरता येतं.
अभयारण्यात शिरताच बाभळीची आणि थोडं पुढं गेल्यास चन्या-मन्या बोरांची खुरटी झाडं सुरू होतात. अभयारण्यात फिरण्यासाठी सर्वत्र मातीचे रस्ते आहेत. वन्य जीवन पाहण्यासाठी दोन वॉच टॉवरही आहेत. आत शिरताच वाहनाची गती मंदच ठेवावी. चिंकारा हरणं खूपच लाजाळू असतात. वाहनांची त्यांना सवय आहे म्हणून शक्यतो वाहनात बसूनच त्यांना पाहावे. छोट्या छोट्या कळपांनी ही हरणं फिरत असतात. काटवनांचं स्वरूप पाहता, ती जगतात कशी, याचं आश्चर्य वाटतं. पूर्णपणे मुरमाड जमीन असल्यामुळं गवत जवळजवळ नसतंच आणि जे असतं ते वाळलेलं असतं. परिणामी ही हरणं हिरव्या चाऱ्यासाठी आसपासच्या शेतात शिरतात. पिकांची नासाडी होत असल्यानं, त्यांची शिकारही होत असावी. पण त्याबाबत कोणीच काही बोलत नाहीत. सुमारे १०-१५ वर्षांपूर्वी इथं किमान २५० चिंकारा हरणं होती. आता मात्र चाळीस-पन्नासच असावीत, असा अंदाज आहे.
या अभयारण्यात पूर्वी खासगी जमिनी होत्या. अभयारण्य जाहीर झाल्यापासून तिथं शेती होत नव्हती. गेल्या दोन वर्षांत मात्र अगदी मधोमध शेतकऱ्यांनी पुन्हा शेती कसण्यास सुरवात केली आहे. पिकं वर आल्यानंतर हरणं इथं येणारच. शेतकरी त्यांना हुसकावून लावण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करणारच! त्यांची संख्या कमी होण्याचं हे देखील एक कारण आहे. शिवाय इथं मेंढपाळ रोज शेकडोंच्या संख्येनं मेंढरं घेऊन येतात. हरणांच्या हक्काचा चारा ही मेंढरंच फस्त करतात, मग हरणांनी करावं काय ?
माळरानांतच कायम वास्तव्य असलेले चेस्टनट बेलीड सँडग्रूज (पखुर्डी) इथं हमखास पाहायला मिळतात. मात्र इथल्या मातीशी ते इतके एकरूप झालेले असतात, की त्यांचं बसण्याचं ठिकाण माहिती असणाऱ्यालाच ते हमखास दिसतात. जमिनीच्या मातकट रंगाशी कॅमोफ्लेज झालेले हे पक्षी, किंचितही चाहूल लागल्यास भुर्रकन उडून जातात आणि तेव्हा लक्षात येतं, की इथं एक-दोन नाही, तर १५-२० पक्ष्यांचा थवाच होता. मला त्यांच्या दोन-तीन जागा माहिती असल्यानं, मी नेमका त्या ठिकाणी जातो. माझ्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांना आश्चर्य वाटतं, पण ते माझं ‘सीक्रेट’ आहे. या लाजऱ्या-बुजऱ्या पक्ष्यांची मी अगदी जवळून छायाचित्रं काढली आहेत. त्यांची आणि माझी ओळख आता जणू पक्की झाली असावी.
या काटवनात लिटल ब्राऊन डव्ह (होला), स्पॉटेड डव्ह (ठिपक्या होला) आणि युरेशिअन कॉलर्ड डव्ह (पठाणी होला) यांच्याशिवाय रेड कॉलर्ड डव्ह (तांबी होला) ही कबुतरंही दिसतात. पहिले तीन सर्वत्र दिसतात, मात्र, तांबी होला हे इथलं विशेष म्हणता येईल. अभयारण्यात प्रवेश केल्यानंतर पहिल्याच तिठ्यावरून उजवीकडं वळल्यानंतर आपण वनखात्यानं तयार केलेल्या एका पाणवठ्यावर येतो. सकाळच्या वेळी इथं आल्यास अनेक प्रकारचे पक्षी दिसतात. त्यात व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर (खंड्या), इंडियन सिल्व्हरबिल (शुभ्रकंठी मनोली), लिटल ग्रीन बी ईटर (वेडा राघू), ब्लॅक ड्राँगो (कोतवाल), पर्पल सनबर्ड (शिंजीर), सदर्न ग्रे श्राईक (राखी खाटीक), लाँग टेल श्राईक (नकल्या खाटीक), बे बॅक्ड श्राईक (छोटा खाटीक), ग्रे फँकोलिन (चित्तूर किंवा तित्तीर), लार्ज ग्रे बॅबलर (सातभाई), जंगल बॅबलर (रानभाई), ब्राह्मणी स्टारलिंग (ब्राह्मणी मैना), स्कारलेट मिनिव्हेट (निखार) हे पक्षी दिसतात. हिवाळ्यात इथं ग्रे नेक्ड बंटिंग (करड्या मानेचा भारीट) आणि युरेशियन रायनेक (मानमोडा) हे स्थलांतरित पक्षीही दिसतात.
काटवनात फिरताना साईक्स लार्क (दख्खनी चंडोल), अॅशी क्राऊन्ड फिंच लार्क (डोंबारी), कॉमन हुप्पो (हुदहुद), इंडियन रोलर (भारतीय नीलपंख किंवा नीलकंठ) यांच्यासह शिक्रा (शिक्रा), माँटेग्यूज हॅरियर (माँटेग्यूचा भोवत्या), सॉर्ट टोड ईगल (सर्पमार गरुड), टॉनी ईगल (सुपर्ण), कॉमन केस्ट्रेल (खरुची) हे शिकारी पक्षीही दिसतात. इथं नाईटजारही वास्तव्याला असल्याचं समजलं, पण मला कधीच दिसला नाही.
माळरानं आणि काटवनांत पक्ष्यांची संख्या तुलनेनं जास्त असते. परंतु, ही वनं आणि रानं आता कमी होऊ लागल्यामुळं, या पक्ष्यांची संख्याही कमी होऊ लागली आहे की काय, अशी भीती वाटू लागली आहे. निसर्गचक्राचं रक्षण हे आपलं कर्तव्य आहे, ही भावना अंगी रुजवल्यास, त्यांचं संरक्षण आणि वर्धन करता येणं शक्य आहे.
– अरविंद तेलकर
arvind.telkar@gmail.com

Shri Ram Navami, Celebration in Shegaon, Grandeur and Devotion, gajanan maharaj shegaon, ram navami 2024, ram navami celebration in shegaon, ram navami,
‘श्रीराम नवमी’निमित्त ६७० दिंड्या दाखल, शेगावनगरी भाविकांनी फुलली
Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध
Nagpur, people poisoned,
नागपूर : कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबा मंदिरात २५ जणांना विषबाधा
Trimbakeshwar taluka, nashik district, water scarcity
त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणी टंचाईमुळे स्थिती बिकट