सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशनमधील लैंगिक शोषणाच्या घटनांना वाचा फुटल्यानंतर आता राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील (एफटीआयआय) लैंगिक शोषणाचे आणि लिंगभेद होत असल्याच्या घटना माजी विद्यार्थिनींनी समाजमाध्यमांद्वारे मांडल्या आहेत.

संस्थेत शिकलेल्या एका माजी विद्यार्थिनीने २०११ मध्ये घडलेली घटना लिहून ‘एफटीआयआय’मधील ‘मीटू’ची सुरुवात केली. तसेच अन्य विद्यार्थिनींना त्यांचे अनुभव मांडण्याचे आवाहन केले. त्यानंतर या विषयावर अनेक विद्यार्थिनींनी त्यांचे अनुभव व्यक्त केले. त्यात एका विद्यार्थिनीने लिंगभेदाचा अनुभव आल्याचे सांगितले. कोणीतरी सवर्ण फेमिनिस्ट किंवा व्हाइट फेमिनिस्ट म्हटल्याचे सांगत सर्वसाधारण सभेत आणखी एका विद्यार्थिनीला ‘तुम लोग कोई सती सावित्री नही हो’असे म्हणण्यात आल्याचे नमूद केले, तर एका विद्यार्थिनीने पार्टीनंतर  एका विद्यार्थ्यांने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला. तसेच ‘एफटीआयआय’मध्ये मुलींना नेहमीच दुय्यम लेखले जाते, मुलींबरोबर होणाऱ्या गैरप्रकारांची तक्रारही होत नाही. अंतर्गत तक्रार समितीकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यास त्याची दखल घेण्यात आली नसल्याचे तिने लिहिले आहे.

प्राध्यापक, विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घ्यावी

लैंगिक, मानसिक शोषण म्हणजे काय, त्याबाबत कशी तक्रार दाखल करावी, त्यावर काय कारवाई करावी, त्याचे कायदेशीर परिणाम होऊ शकतात याची विद्यार्थी, प्राध्यापक, विभागप्रमुख या सर्वासाठी कार्यशाळा घेण्यात यावी, असे एका विद्यार्थिनीने नमूद केले आहे.

‘एफटीआयआय’मध्ये लैंगिक शोषणाबाबतच्या तक्रारींसाठी अंतर्गत तक्रार समिती आहे. विद्यार्थिनींबरोबर, विशेषत विद्यार्थ्यांकडून असा काही प्रकार झाल्यास त्यांनी तथाकथित विद्यार्थी संघटनेच्या बैठकीत आपसात मिटवण्यापेक्षा अंतर्गत तक्रार समितीकडे तक्रार दाखल करायला हवी. या पूर्वी अंतर्गत तक्रार समितीने आलेल्या तक्रारींची दखल घेऊन कारवाई करण्याची शिफारस केली. त्यानुसार प्रशासनाने तत्काळ कारवाईही केली. लैंगिक शोषणाबाबतचे प्रकार एफटीआयआय प्रशासन खपवून घेत नाही, याची विद्यार्थ्यांनाही कल्पना आहे.

– भूपेंद्र कँथोला, संचालक, एफटीआयआय