प्रसारमाध्यमे हा लोकशाहीचा चौथा खांब आहे की तिरडीचा बांबू? असा सवाल करून साहित्यसंमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी अध्यक्षीय भाषणात शनिवारी माध्यमांनाच लक्ष्य केले आणि प्रसारमाध्यमांनी याचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. माझे काही चुकत असेल, तर जरूर चर्चा करा. संवादी सामर्थ्यांची बेरीज जमत नसेल तर मला आणि माझ्या भूमिकेला दोष देऊ नका, असेही ते म्हणाले.
मानदंड आणि अस्मिता यांच्यातील भेद आपल्याला समजला नाही. मानदंड आणि अस्मितेचे अहंकारात रूपांतर करून संतांच्या जातिनिहाय वाटणीमुळे महाराष्ट्राचे वाटोळे झाले, असे डॉ. सबनीस यांनी सांगितले. फुले, शाहू, आंबेडकरी परंपरेने पूर्वीची भक्तिपरंपरा नाकारली. या भक्तिपरंपरेतील संतांनी प्रबोधनाच्या माध्यमातून माणसांना सुधारण्याचे काम केले. आम्ही मात्र त्यांना जातीत अडकवून फूट पाडली, असेही ते म्हणाले.
सध्याची सेक्युलॅरिझमची कल्पना ही धर्माची चिकित्सा सुरू करण्यापासून सुरू होते आणि धर्माचा विलय होईपर्यंत थांबते. मात्र सध्याचा सेक्युलॅरिझम हा धर्मनिरपेक्षतेपाशी आहे. उद्या तो निधर्मी होईल आणि परवा एखाद्या धर्माच्या विरोधातही जाईल, असे स्पष्ट करत सबनीस यांनी दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी या पुरोगाम्यांचे मारेकरी हे नथुरामच्या विचारसरणीचे आहेत, असा आरोपही केला.