विमा कंपन्याच्या विरोधात दाद मागता येणारे विमा लोकपालचे कार्यालय पुण्यात नुकतेच सुरू झाले आहे. या विमा लोकपाल पुढे चाललेल्या खटल्यात एका ज्येष्ठ व्यक्तीला न्याय मिळाला. चुकीच्या कारणामुळे ज्येष्ठ व्यक्तीच्या वैद्यकीय विम्याची रक्कम नाकारणाऱ्या नॅशनल इन्शुरन्स कंपनीला विमा लोकपाल (ओंम्बुड्समन) यांनी चार लाख रुपये व्याजासह देण्याचे आदेश दिले आहेत. या ज्येष्ठ व्यक्तीने स्वत: युक्तिवाद करीत हा दावा जिंकला.
याबाबत चंद्रशेखर आर. देशपांडे (वय ६२, रा. एमआयटी कॉलेज रस्ता, कोथरूड) यांनी तक्रार केली होती. देशपांडे हे बँक ऑफ इंडियातून वरिष्ठ व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांनी २०११ मध्ये नॅशनल इन्शुरन्स कंपनीचा पाच लाखांचा वैद्यकीय विमा उतरविला होता. देशपांडे यांना ३१ जुलै २०१२ ला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्यांच्या अ‍ॅन्जीओप्लास्टी करून अतिदक्षता विभागात ठेवले गेले. पण, त्यांना सायंकाळी पुन्हा दुसरा झटका आला. त्यामुळे लंग हॅमरेज होऊन त्यांची परिस्थिती नाजूक झाली. दुसऱ्या दिवशीपासून त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या यंत्रावर ठेवण्यात आले. हा उपचार पंधरा ते वीस दिवस केल्यानंतर त्यांना शुद्ध आली. त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर ३० ऑगस्ट २०१२ ला घरी सोडण्यात आले. त्यांच्या उपचाराला एकूण १४ लाख ४४ हजार रुपये खर्च आला.
देशपांडे यांनी वैद्यकीय विमा उतरविला असल्यामुळे त्यांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडे विम्याची रक्कम मिळावी म्हणून अर्ज केला. ब्लड प्रेशर (बीपी) असल्यामुळे लंग हॅमरेज झाल्याचे सांगत विमा कंपनीने त्यांची विम्याची रक्कम नाकारली. देशपांडे यांनी पत्रव्यवहार करून बीपी व लंग हॅमरेजचा काही संबध नसल्याचे सांगितले. पण, विमा कंपनीने दाद दिली नाही. त्यामुळे त्यांनी विमा कंपनीच्या विरोधात न्याय देणारी यंत्रणा असलेले विमा लोकपाल कार्यालय (इन्शुरन्स ओंम्बुड्समन) कडे तक्रार केली. या विमा लोकपालचे कार्यालय सुरुवातीला मुंबईला होते. पण, ते काही महिन्यांपूर्वी पुण्यात सुरू झाले आहे. या ठिकाणी देशपांडे याच्या तक्रारीवर विमा लोकपाल ए. के. साहू यांच्यासमोर सुनावणी झाली. या वेळी विमा कंपनीने त्यांची बाजू मांडली. त्यांनी बीपी असल्यामुळे लंग हॅमरेज झाले म्हणून विमा नाकाल्याचा युक्तिवाद केला. मात्र, देशपांडे यांनी त्यांची केस ही इतरांप्रमाणे नसल्याचे सांगत वैद्यकीय दाखले दिले. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर इतर व्यक्ती पाच ते सहा दिवसांत बऱ्या होतात. मात्र, त्यांना पंधरा ते वीस दिवस अतिदक्षता विभागात राहावे लागले. लंग हॅमरेज हे उपचार करताना औषधाच्या परिणामुळे झाले होते. ग्राहक न्यायालयात अशाच पद्धतीने चाललेल्या खटल्याचा दाखला त्यांनी दिला. विमा लोकपाल साहू यांनी देशपांडे यांच्या बाजूने निकाल देत विमा कंपनीला त्यांना चार लाख रुपये व्याजासह देण्याचे आदेश दिले आहेत.