‘मॅग्मो’ संघटनेच्या राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी शासनाने अत्यावश्यक सेवा व देखभाल (मेस्मा) कायद्याचा बडगा उगारल्यानंतरही डॉक्टरांचा संप सुरूच राहिला. शासनाने नोटिसा बजावलेल्या डॉक्टरांमध्ये औंध जिल्हा रुग्णालयातील ३३ डॉक्टरांचा समावेश आहे.
शनिवारी या डॉक्टरांना ‘रविवारी सकाळी ८ वाजता कामावर हजर व्हावे अन्यथा ‘मेस्मा’अंतर्गत कारवाई करू,’ अशा आशयाच्या नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती मॅग्मोचे पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. मात्र संघटनेने संपाचा निर्णय मागे न घेता रविवारीही संप सुरूच ठेवला. डॉक्टरांच्या या निर्णयाचा रुग्णांना मात्र फटका बसत असून औंध जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांअभावी होत असलेले रुग्णांचे हाल कायम आहेत.
डॉ. खोमणे म्हणाले, ‘‘आम्ही मिळालेल्या नोटिसांची होळी केली असून रविवारीही कामावर रुजू झालेलो नाही. दरम्यान, रविवारी शासनाने मुंबईत  संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ‘संप मागे न घेतल्यास नोटिसा दिलेल्या डॉक्टरांवर पोलिसात गुन्हे दाखल केले जातील,’ असा निरोप पाठवला आहे. परंतु डॉक्टर जेलभरो आंदोलन करण्यास तयार असल्याचे संघटनेने कळवले आहे.’’