परिहार सेवेस (पॅलिएटिव्ह केअर) वैद्यकीय क्षेत्रात मिळणारे दुय्यम स्थान, एखाद्या आजारात मृत्यू टाळता येण्यासारखा नसेल, तर वेदनादायी उपचार कुठे थांबवावेत, याबद्दलच्या जागृतीचा अभाव आणि मॉफिनसारख्या वेदनाशामक औषधांच्या वैद्यकीय वापरावर येणारी बंधने याबाबत परिहार सेवा क्षेत्रातील तज्ज्ञांनी आपली मते व्यक्त केली.
११ ऑक्टोबर हा दिवस ‘वर्ल्ड हॉस्पाइस अँड पॅलिएटिव्ह डे’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्त ‘सिप्ला पॅलिएटिव्ह केअर अँड ट्रेनिंग सेंटर’तर्फे या विषयाच्या जनजागृतीसाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. प्रियदर्शिनी कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘काही विशिष्ट आजारामुळे रुग्णाचा मृत्यू होणे टाळता येण्यासारखे नसेल, तर त्याच्यावर अतिदक्षता विभागात वेदनादायी उपचार करत राहण्यापेक्षा त्याला वेदनांपासून आराम कसा मिळेल याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. अतिदक्षता विभागात रुग्ण आप्तेष्टांपासून दूर आणि विविध वैद्यकीय उपकरणांनी, नळ्यांनी जखडलेल्या अवस्थेत असतो. याउलट परिहार सेवा केंद्रात रुग्णाला त्याचे उरलेले आयुष्य वेदनामुक्त रीतीने जगता येते. त्याचे जवळचे नातेवाईक त्याला सोबत करू शकतात. घरच्या मंडळींना परिहार सेवेचे प्रशिक्षण दिल्यानंतर ते रुग्णाला घरीच ठेवून त्याची सेवा करू शकतात.’’    ‘राज्यात केवळ ५ परिहार सेवा केंद्रे असून त्यातील २ पुण्यात आहेत. देशात कोणत्याही वेळी सुमारे २५ लाख कर्करुग्ण आढळत असून त्यात दर वर्षी सुमारे १० लाख नवीन कर्करुग्णांची भर पडते. २०१२ मध्ये अमेरिकन कॅन्सर सोसायटीतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका पाहणीत भारतात त्या वर्षी ७ लाख रुग्णांचा कर्करोगाने मृत्यू झाला असून त्यातील ८० टक्के कर्करुग्णांना अतिशय वेदनादायी मृत्यू आल्याचे दिसून आले होते,’ असेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. पुण्यातील सिप्ला सेंटरमध्ये अशा रुग्णांना मोफत परिहार सेवा मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.