07 July 2020

News Flash

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात औषधी वनस्पती केंद्र

केंद्राविषयी माहिती देताना डॉ. मोकाट म्हणाले, की औषधी वनस्पतींना देशात आणि विदेशात मोठी मागणी आहे

आयुष मंत्रालयाची मान्यता, १.६७ कोटींचा निधी

पुणे : केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागाला ‘पश्चिम विभागीय औषधी वनस्पती केंद्र’ म्हणून मान्यता दिली आहे. या केंद्राच्या अखत्यारित गोवा, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान या राज्यांसह दादरा-नगर हवेली आणि दीव-दमण हे केंद्रशासित प्रदेश असून, औषधी वनस्पतींची लागवड, संवर्धन, संशोधन या केंद्राच्या माध्यमातून केले जाणार आहे. या केंद्रासाठी १ कोटी ६७ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

देशभरात अशा पद्धतीची सहा केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. त्यात बंगालमधील जादवपूर विद्यापीठ, आरआयआयएसएम जोगिंदर नगर, काश्मीर विद्यापीठ, जबलपूर येथील वन संशोधन केंद्र, केरळ वन संशोधन संस्था आणि जोरहाट येथील आसाम वन संशोधन संस्था यांचा समावेश आहे. आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील केंद्राच्या रुपाने सातवे केंद्र तयार झाले आहे. विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. दिगंबर मोकाट हे या केंद्राचे प्रमुख, तर विभागप्रमुख प्राध्यापक डॉ. अविनाश अडे हे समन्वयक आहेत.

केंद्राविषयी माहिती देताना डॉ. मोकाट म्हणाले, की औषधी वनस्पतींना देशात आणि विदेशात मोठी मागणी आहे. मात्र, विविध कारणांनी वनसंपदा नष्ट होऊ लागली असून औषधी वनस्पती, वृक्ष दुर्मीळ झाले आहेत. त्यामुळे औषधी कंपन्या, वैद्यांना कच्चा माल पुरेसा उपलब्ध होत नाही. देशाच्या पश्चिम विभागात गुग्गुळ, सोनामुखी, इसबगोल, अश्वगंधा, सीताअशोक, बेल, शिवन, पाडळ, टेटू, अग्निमंथ, रानवांगी, सालवन, पीठवन, गोखरू, अनंतमूळ, खाजखुजली, बिवळा, बकुळ, पिंपळी, सफेदमुसळी, कोलीयस, लोध्र, वरुण, चित्रक अशा अनेक औषधी प्रजाती आढळतात. या केंद्राद्वारे त्यांचे संवर्धन केले जाईल.

पश्चिम विभागीय केंद्राद्वारे राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांना पोहोचवली जाईल. तसेच विविध स्वयंसेवी संस्था, शासकीय-निम शासकीय संस्थांना सोबत घेऊन अंमलबजावणी केली जाईल. केंद्रातर्गत पाचही राज्यांमध्ये बाजारपेठेत मागणी असलेल्या, दुर्मीळ होत असलेल्या औषधी वनस्पतींच्या रोपांची निर्मिती, शास्त्रशुद्ध लागवड, काढणीपश्चात तंत्रज्ञान, औषधी वनस्पतींच्या बागांची निर्मिती, बाजारपेठे उपलब्धता, रोपवाटिकांची निर्मिती या साठी प्रशिक्षणे, कार्यशाळा, चर्चासत्रांद्वारे शेतकरी, आदिवासी, विद्यार्थी, संशोधक, उद्योजक, प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांना मार्गदर्शन केले जाणार असल्याचे डॉ. मोकाट यांनी सांगितले.

औषधी वनस्पती क्षेत्रातील कार्यरत असलेल्यांना निधी

औषधी वनस्पतींची सद्य:स्थितीतील उपलब्धता,सद्य:स्थितीतील बाजारपेठ या विषयीच्या मूलभूत माहितीचे संकलन करून त्याचा संशोधनामध्ये उपयोग करून घेतला जाणार आहे. तसेच संशोधनासाठी केंद्राच्या माध्यमातून औषधी वनस्पती क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना अनुदान प्राप्त करून दिले जाणार आहे, असेही डॉ. मोकाट म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2020 2:54 am

Web Title: medicinal plants center savitribai phule pune university zws 70
Next Stories
1 भूमिकेपेक्षा प्रेक्षकांची आवड महत्त्वाची
2 भाजपाला बसणार धक्का; जयसिद्धेश्वर शिवाचार्यांची खासदारकी धोक्यात
3 पुणे : मौजमजा करण्यासाठी प्रोफेशनल डान्सरसह तिघांनी चोरल्या 25 दुचाकी
Just Now!
X