News Flash

फॅमिली डॉक्टर्स उभारणार ‘मेडिसीन बँक’

मोफत मिळालेल्या परंतु दर्जेदार औषधांची बँक करून ती ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांत पाठवण्याचे फॅमिली डॉक्टरांनी ठरवले आहे.

| February 14, 2014 03:22 am

औषध कंपन्यांकडून डॉक्टरांना नमुन्यादाखल मोफत मिळणारी औषधे प्रत्येक वेळी वापरली जातातच असे नाही. अशा मोफत मिळालेल्या परंतु दर्जेदार औषधांची  बँक करून ती ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांत पाठवण्याचे फॅमिली डॉक्टरांनी ठरवले आहे. पुणे डॉक्टर्स चॅरिटेबल ट्रस्टने (पीडीसीटी) जिल्हा परिषदेच्या साहाय्याने हा उपक्रम हाती घेतला असून सुमारे ४ हजार डॉक्टर्स यासाठी औषधे जमा करणार आहेत.
पीडीसीटीचे अध्यक्ष डॉ. संताजी कदम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन. डी. देशमुख आणि डॉक्टरांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
कदम म्हणाले, ‘‘फॅमिली डॉक्टरांबरोबरच काही औषध कंपन्याही मेडिसीन बँकेमध्ये औषधे देणार आहेत.’’ इच्छुक डॉक्टरांनी पेशवे उद्यानाजवळील नोव्हा सर्जिकल हॉस्पिटल येथे औषधे दान करावीत असे आवाहन करण्यात आले आहे. जमा होणारी औषधे १ मार्चला आरोग्य खात्याकडे सुपूर्द केली जातील.
शासनाचा ‘प्रिस्क्रिप्शन फ्री दवाखाने’ हा उपक्रम १५ एप्रिलपासून कार्यान्वित होत आहे. याअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना सुचवलेले एकही औषध बाहेरून खरेदी करावे लागणार नाही. या रुग्णालयांना शासनस्तरावरून औषध पुरवठा करण्यात येणार आहे. डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘दवाखान्यांत कोणत्याही वेळी उपलब्ध हवीतच अशी ६८ अत्यावश्यक औषधे या उपक्रमाअंतर्गत पुरवण्यात येणार आहेत. तसेच इतर ३४३ अत्यावश्यक औषधांचाही समावेश आहे. अॅलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी अशा तिन्ही पॅथींची औषधे यात उपलब्ध होतील.’’ शासनाकडून १ एप्रिलपर्यंत औषधे ताब्यात येणार असून उपक्रम १५ किंवा १६ एप्रिलला कार्यान्वित होईल. फॅमिली डॉक्टरांकडून येणाऱ्या औषधांचा या उपक्रमाबरोबरच शासनाच्या इतर आरोग्य योजनांना फायदा होईल. जिल्हा परिषदेतर्फे या औषधांची वर्गवारी करून त्यानंतरच ती ग्रामीण दवाखान्यांना पाठवण्यात येतील.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 3:22 am

Web Title: medicine bank by family doctors
Next Stories
1 ‘सोफोश’च्या मान्यतेचे नूतनीकरण झाल्याने बालकांसाठी आसुसलेल्या पालकांना दिलासा
2 विद्यार्थी निरीक्षणाचे गोंडस नाव अन् प्रवेशासाठी मुलाखती सुरूच!
3 अनधिकृत बांधकामांविषयीचे धोरण अन् ‘तारीख पे तारीख’
Just Now!
X