महापालिकेतर्फे होत असलेली औषध खरेदी गाजत असतानाच आणखी दोन औषधांची खरेदीही शासनदराच्या दरापेक्षा दुप्पट दराने होत असल्याची कागदपत्रे बुधवारी उजेडात आली. त्यामुळे अशाच पद्धतीने कोटय़वधी रुपयांची औषध खरेदी होत असल्याची शंका घेण्यात आली असून त्यासंबंधीचे निवेदन बुधवारी आयुक्तांना देण्यात आले असून या खरेदीबाबत आता आयुक्त काय करणार याकडे लक्ष लागले आहे.
स्थायी समितीने मंगळवारी कीटकनाशके व औषध खरेदीचा एक प्रस्ताव मंजूर केला असून तो समितीत मंजूर होत असतानाच या खरेदीत घोटाळा असल्याचे माहिती अधिकारामुळे उघड झाले. समितीने मंजूर केलेल्या एका कीटकनाशकाचा दर महापालिकेसाठी १,१७४ रुपये प्रतिलिटर लावण्यात आला असून तेच कीटकनाशक राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने निम्म्या दराने म्हणजे ५८७ रुपये प्रतिलिटर प्रमाणे घेतले आहे. या खरेदीत ४७ लाख रुपये जादा दिले जाणार आहेत. खरेदीत सात औषधांचा समावेश असून सर्वच औषधांची खरेदी अशाप्रकारे होत असावी, अशी तक्रार सजग नागरिक मंचतर्फे आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
या खरेदीतील आणखी दोन औषधांचे दर सजग नागरिक मंचला बुधवारी मिळाले. त्यातील एक कीटकनाशक राज्य शासनाने १,३५० रुपये प्रतिलिटर या दराने खरेदी केले असून महापालिका तेच कीटकनाशक १,९७५ रुपये प्रतिलिटर या दराने खरेदी करत आहे. महापालिका या कीटकनाशकाची दोन हजार लिटर इतकी खरेदी करणार आहे. या खरेदीत १३ लाख रुपये जादा मोजले जाणार आहेत. तसेच बीटीआय लिक्विडची खरेदी ९५० रुपये प्रतिलिटर या दराने शासनाने केली असून महापालिका हे औषध १,३८६ रुपये प्रतिलिटर या दराने खरेदी करत आहे. या खरेदीत तब्बल ३५ लाख रुपये जादा मोजले जाणार असल्याचे आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
खरेदीतील तीन कीटकनाशकांची माहिती घेतली असता ९५ लाख रुपये जादा देण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याचे दिसत असून या सर्वच खरेदीची चौकशी करावी तसेच ती पूर्ण होईपर्यंत खरेदीचे आदेश संबंधितांना देऊ नयेत, अशीही मागणी सजग नागरिक मंचने केली आहे.