स्वाइन फ्लूवरील आठशे रुपये किमतीच्या लशीसाठी काही डॉक्टरांकडून दोन हजार ते बावीसशे रुपये आकारले जात असल्याच्या तक्रारी केमिस्ट असोसिएशनकडे आल्या आहेत. लशीसाठी डॉक्टरांकडून महागडा दर लावला जात असल्यास नागरिकांनी औषधविक्री दुकानामधूनच लस खरेदी करण्याचा आग्रह धरावा, असेही संघटनेने म्हटले आहे.
 ‘महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन’च्या पश्चिम विभागाचे सचिव अनिल बेलकर म्हणाले, ‘‘नेझोव्हॅक- एस’ या नाकात थेंब टाकण्याच्या लशीची किंमत आठशे रुपये आहे. काही डॉक्टर लशीसाठी २००० ते २२०० रुपये आकारत असल्याच्या तक्रारी ‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट’कडे आल्या आहेत. नागरिक व केमिस्ट यांच्याकडून या तक्रारी आल्या असून अशा डॉक्टरांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. नागरिकांनी स्वाइन फ्लूच्या लशीचे प्रिस्क्रिप्शन घेऊन ती औषधविक्रेत्यांकडून खरेदी करावी आणि डॉक्टरांकडून टोचून घ्यावी.’’
‘इंडियन मेडिकल असोसिएशन’कडे डॉक्टर लस महाग विकत असल्याबद्दल लेखी तक्रारी आल्या नसल्याची माहिती संघटनेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. अरुण हळबे यांनी दिली. अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त बा. रे. मासळ म्हणाले, ‘‘लशी महाग विकल्या जात असल्याची कोणतीही तक्रार एफडीएला प्राप्त झालेली नाही. औषधविक्रेत्यांकडून लस खरेदी केल्यास त्या जास्त किमतीला मिळण्याचा प्रश्न उद्भवत नाही. डॉक्टर लशीसाठी अधिक पैसे आकारत असतील तर त्यांच्यावर संबंधित यंत्रणेमार्फत कारवाई व्हायला हवी.’’
लशींना मागणी प्रचंड, पुरवठा मात्र कमी
सीरम इन्स्टिटय़ूटने बनवलेल्या ‘नेझोव्हॅक- एस’ या नाकात थेंब टाकण्याच्या लशीची ६५ हजार डोसची तिसरी बॅच शुक्रवारी बाजारात येणे अपेक्षित होते. यापूर्वी नेझोव्हॅक लशींचे केवळ २२०० डोस पुण्यातील घाऊक औषधविक्रेत्यांना मिळाले होते. मागणीच्या तुलनेत ते पुरेसे नव्हते. ‘इंजेक्टेबल’ म्हणजे टोचून घेण्याच्या दोन प्रकारच्या लशीही बाजारात आहेत, पण त्यांचाही साठा बाजारात उपलब्ध नाही. हा साठा २ ते ३ दिवसांत येण्याची शक्यता असल्याचे बेलकर यांनी सांगितले. यातील ‘अ‍ॅबॉट’ कंपनीच्या ‘इन्फ्लुव्हॅक’ या लशीची किंमत ७१४ रुपये आहे. याशिवाय ‘सॅनोफी’ या कंपनीचीही लसही सध्या उपलब्ध नसल्याचे ते म्हणाले. टोचून घेण्याच्या लशींपेक्षा नाकात फवारायच्या लशीची मागणी अधिक आहे.
स्वाइन फ्लूच्या लशींबद्दल :
– दमा, फुफ्फुसांचे आजार असे अन्य आजार असलेल्या आणि ज्यांना बाहेर पडावे लागते अशा व कार्यालयात काम करणाऱ्या रुग्णांनी स्वाइन फ्लूची प्रतिबंधक लस प्रामुख्याने घ्यावी, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
– कोणत्याही आजारावरील लस घेतली म्हणजे तो आजार कधी होणारच नाही, असे नसते. याबद्दल ‘सीरम’ संस्थेचे संचालक डॉ. सुरेश जाधव म्हणाले, ‘‘नाकात फवारायची लस घेणाऱ्या ७५ ते ८० टक्के लोकांना त्यापासून रोगप्रतिकारशक्ती मिळते असे दिसून आले आहे.’’     
– स्वाइन फ्लूवरील टोचून घेण्याच्या लशींमध्ये ज्या विषाणूचा अंतर्भाव असतो तो मेलेला विषाणू असतो. लस टोचल्यावर या विषाणूच्या विरोधात ‘अँटिबॉडी’ तयार होतात.
– नाकात फवारायच्या लशीतील विषाणू जिवंत स्वरुपात असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘लशीतील विषाणू जिवंत असला तरी त्या विषाणूने संसर्ग होत नाही. हा विषाणू नाकातून फुफ्फुसांमध्ये जातो आणि तिथे तो वाढून त्यापासून रोगप्रतिकारशक्ती मिळते. ही लस फ्लूच्या तीन प्रकारांवर (स्ट्रेन्स) काम करते. त्यातील एक स्ट्रेन ‘एच१एन१’ हा आहे.’’