07 December 2019

News Flash

पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी साधना वर्ग

शाळांतील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आता दररोज किमान दहा मिनिटे ध्यानधारणा करावी लागणार आहे.

पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील शाळांतील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आता दररोज किमान दहा मिनिटे ध्यानधारणा करावी लागणार आहे. त्यासाठी शाळांमध्ये ‘आनापान साधना वर्ग’ घेण्याचे आदेश शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.

आनापान साधना पद्धती ही विपश्यना साधना शिकण्याची पहिली पायरी आहे. बालपणी आणि पौगंडावस्थेत परीक्षेविषयीची चिंता, काळजी आणि ताणतणाव आनापान साधनेद्वारे विद्यार्थी आत्मविश्वासाने हाताळू शकतात. याच्या दैनंदिन सरावामुळे मुलांमध्ये एकाग्रता, स्मरण शक्ती, निर्णय क्षमता, कार्यक्षमता, कृतिशीलता वाढते.

भीती, उदासीनता कमी होऊन आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. त्यामुळे सुदृढ मानसिकतेची पिढी घडवण्यासाठी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये पाचवी ते बारावीच्या शाळांमध्ये आनापान साधना वर्ग सुरू करण्यास सांगण्यात आले आहे.

या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका शिक्षकाने दहा दिवसांचे विपश्यना, मित्र उपक्रमाचे एक दिवसाचे प्रशिक्षण घेतलेले असणे उपयुक्त आहे. त्या अनुषंगाने गेल्या सात वर्षांत १५ हजार शिक्षकांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले असून त्यांच्या शाळांमध्ये ते त्याचा वापर करीत आहेत.

सर्व शाळांमध्ये दहा दिवसांचे विपश्यना आणि एक दिवसाचे मित्र उपक्रमाचे प्रशिक्षण पूर्ण केलेला शिक्षक उपलब्ध होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता असल्याने जिल्हा आणि तालुका स्तरावर प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकास मित्र उपक्रमाचे तीन तासाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती

‘आनापान साधना’ हा उपक्रम शालेय स्तरावर राबवण्यासाठी राज्य स्तरावर विद्या प्राधिकरणाच्या विभागप्रमुखांची, जिल्हा स्तरावर डाएटच्या समता विभागाच्या विभागप्रमुखांची, महापालिका स्तरावर प्रशासन अधिका?ऱ्यांची, तालुका स्तरावर गटशिक्षणाधिका?ऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असेल.

First Published on August 15, 2019 4:49 am

Web Title: meditation class for students from fifth to twelth zws 70
Just Now!
X