एकापेक्षा एक सरस आणि जीव ओतून तयार केलेल्या कलाकृतींचं प्रदर्शन ‘काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल’मध्ये सुरू आहे. यातल्या प्रत्येक कलेत काहीतरी दडलं आहे. अर्थात ते शोधण्याची व्यापक दृष्टी मात्र बघणाऱ्यांकडे हवी. कलेच्या या जत्रेत पुण्याच्या ऋषीकेशची कला उठून दिसत होती. ‘पेपर कट्स’ या प्रकारात तयार केलेली मोठी फ्रेम त्यानं प्रदर्शनासाठी मांडली होती. एकावर एक अशा सात कागदांची रचना करून त्यानं ती कलाकृती तयार केली होती. कागदांच्या अनोख्या रचनेमुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या सावलीमुळे ती कलाकृती थ्रीडी प्रकारात मोडत असल्याचा भास निर्माण होत होता. मोठ्या अभिमानानं तो ही कलाकृती येणाऱ्या जाणाऱ्याला दाखवत होता. त्याची ही रचना सगळ्यांना आकर्षितही करत होती अन् प्रत्येकाच्या मनात कुतूहलही निर्माण करत होती. सहाजिकच त्याच्या या कलेकडे पाहून तू देशातल्या कोणत्या कला विद्यालयातून शिक्षण घेतलं? असा प्रश्न येणारे जाणारे त्याला विचारत होते. पण त्याचं उत्तर होतं ‘कोणत्याच नाही.’ इंटरनेटवर शिकून त्यानं ‘पेपर कट्स’ ही कला आत्मसात केली होती.

ऋषीकेश मूळचा पुण्याचा आहे. कलेच्या छंदापायी त्यानं इंजिनिअरिंग सोडलं. ‘इंडियाज् गॉट टॅलेन्ट’च्या पाचव्या सिझनमध्ये ऋषीकेशला त्याची ‘पेपर कट्स’ ही कला जगासमोर सादर करण्याची संधी मिळाली होती. ‘पेपर कट्स’ या प्रकारात पातळ कागदावर कटरच्या साहाय्यानं कलाकृती कोरुन वर काढण्यात येते. कागद पातळ असल्यानं मोठ्या संयमानं कलाकृती कोरावी लागते. यात कागद फाटण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे संयम आणि तितकचं परफेक्शनही आवश्यक असतं. छोटी चूक पूर्ण कलाकृती खराब करू शकते. गेल्या चार वर्षांहून अधिक काळ ऋषीकेश या कलाप्रकारात काम करतोय. एक पेपर कट आर्ट तयार करण्यासाठी पाच ते सहा मिनिटांपासून काही तासांचा अवधी ऋषीकेशला लागतो. रचना जितकी जटील तितके त्यावर काम करण्याचे तास वाढतात.

सध्या ऋषीकेश पेपर कट आर्टचे लाईव्ह कार्यक्रम करतो. प्रत्येक कार्यक्रमासाठी ऋषीकेश पन्नास हजारांहून जास्त रक्कम आकारतो. पेपर कट्स प्रकारात तो समोरच्या व्यक्तीचं पोट्रेट काही मिनिटांत कागदावर कोरून काढू शकतो. आतापर्यंत देशभरात त्यानं १५० हून अधिक लाईव्ह कार्यक्रम केले आहेत. अनेक बड्या वाहिन्यांच्या कार्यक्रमातही त्यानं ‘पेपर कट’चं सादरीकरण केलं आहे. कलेच्या छंदापायी त्यानं शिक्षण सोडलं आणि याच कलेला आपल्या उपजिविकेचं साधन बनवलं. सुरूवातीला शिक्षण अर्धवट सोडल्यानं त्याला घरच्यांचा विरोध झाला पण, महिन्याच्या पगारापेक्षा छंदातून मिळणारं उत्पन्न आणि समाधान त्यापेक्षा जास्त आहे असं ऋषीकेश मोठ्या अभिमानानं सांगतो. ऋषीकेशचं पेपर आर्टमधलं कौशल्य नक्कीच कौतुकास्पद आहे आणि त्याच्या या सुंदर कलाकृतींवर सहज नजर फिरवली तर Pune’s got talent असं तोंडात आल्याशिवाय राहणार नाही हे नक्कीच.

 

प्रतीक्षा चौकेकर

pratiksha.choukekar@loksatta.com