मोबाइलमुळे लहान मुलांमध्ये मोठय़ा प्रमाणात डोळय़ांचे आजार होतात. लहान मुलांमध्ये दिसून येत असलेल्या चष्म्यांचे कारणही तेच आहे. त्यामुळे आठ वर्षांच्या आतील मुलांना मोबाइल व टॅब देऊ नये, असे मत ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी पिंपरीत बोलताना व्यक्त केले.
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, जिजाऊ प्रतिष्ठान आणि रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने एचएच कंपनीच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन डॉ. लहाने यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. आमदार लक्ष्मण जगताप, डॉ. पी. डी. पाटील, आयुक्त राजीव जाधव, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, अॅड. सचिन पटवर्धन आदी उपस्थित होते.
डॉ. लहाने म्हणाले, की नवनवे आजार उद्भवत असताना वैद्यकीय सुविधा मात्र महाग झाल्या आहेत. डॉक्टरांवरील विश्वास कमी होत चालला आहे. अशा प्रकारच्या शिबिरांचा गरजू रुग्णांना नक्की लाभ होईल. ४२ टक्के मृत्यू हृदयविकाराने होतात, काळजी घेतली जात नाही. शरीराकडे लक्ष दिले जात नाही. मृत्यूचा विमा काढला जातो, मात्र आरोग्याचा काढला जात नाही. वास्तविक आरोग्यविमा काढायला हवा. योग्य आहार हवा. जिभेच्या चवीने मेंदूवर विजय मिळवल्याने बऱ्याच व्याधींना निमंत्रण मिळते. भारत मधुमेहाची राजधानी झाली असल्याने तो आजार समजून घेतला पाहिजे. जगताप म्हणाले, सामान्य नागरिकांना रुग्णालयातील महागडे उपचार परवडत नाहीत म्हणून या शिबिराचे आयोजन केले.