28 September 2020

News Flash

स्वातंत्र्याचे मूल्य जाणून घ्यायला हवे – मेघना पेठे

कोणतेही पाश किंवा विवंचना नसलेला माणूस स्वतंत्र आहे असे आपण म्हणतो. पण, ही स्वतंत्र असलेली माणसेही लांब दोऱ्याच्या साखळीने बांधलेली असतात. प्रत्येकाचे आयुष्य हा स्वतंत्र

| December 22, 2014 03:20 am

कोणतेही पाश किंवा विवंचना नसलेला माणूस स्वतंत्र आहे असे आपण म्हणतो. पण, ही स्वतंत्र असलेली माणसेही लांब दोऱ्याच्या साखळीने बांधलेली असतात. प्रत्येकाचे आयुष्य हा स्वतंत्र ऐवज आहे. या अर्थाने प्रत्येक जण स्वतंत्र असला तरी स्वातंत्र्याचे मूल्य जाणून घ्यायला हवे, असे मत प्रसिद्ध लेखिका मेघना पेठे यांनी रविवारी व्यक्त केले.
साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा. रूपाली शिंदे यांनी मेघना पेठे यांच्याशी संवाद साधला.
मनातील एकटेपणाची सल हीच माझ्या लेखनाची प्रेरणा असल्याचे सांगून मेघना पेठे म्हणाल्या, सांगितले जाते ते आणि अमुभवायला लागले ते यामध्ये असलेली तफावत हे एक प्रकारचे ढोंग असते. कित्येक गोष्टी सलत होत्या त्या डायरी लेखनाच्या माध्यमातून कागदावर उतरल्या. लग्नानंतर येणारा एकटेपणा हा वेगळाच असतो. गर्दीतला एकांत माणसाला मुंबईमध्ये भरपूर मिळतो. त्यामुळे प्रवासामध्ये आणि गर्दीत असतानाही माझे लेखन झाले. माझ्या काही कथांची बीजे या लेखनामध्ये सापडतात.
ऐंशी टक्के माणसांची घरे तथाकथित अर्थाने शाबूत असतात. मात्र, त्यामध्ये कोणाचे असंतोष असतात. तर, कोणाचे अपेक्षाभंग असतात. जे वरकरणी जाणवत नाहीत. या प्रश्नांचा धांडोळा घेणे महत्त्वाचे वाटते. त्यातून तुटलेपण, एकाकीपण अधोरेखित होत असते. आपण एकटे आहोत हे एकदा मान्य केले की मग ते एकाकीपण आपण साजरे करू शकतो. ही मानवी अवस्था असल्याने यामध्ये स्त्री-पुरुष असा भेद करू नये, असे स्पष्ट करून मेघना पेठे म्हणाल्या, सत्तास्थानाला धोका पोहोचल्याने दहशतवाद वाढला आहे. त्यामागे समाजामध्ये असलेली विषमता कारणीभूत आहे. ही विषमता केवळ आर्थिक नाही तर, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विषमताही त्याचाच एक भाग आहे. या विषमतेकडे आवश्यक त्या निकडीने पाहिले जात नाही.
सायंकाळच्या सत्रात सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर निर्मित ‘संहिता’ हा राष्ट्रीय पुरस्कारविजेता चित्रपट दाखविण्यात आला. उत्तरार्धात या चित्रपटाविषयी चर्चात्मक कार्यक्रम झाला.
 महिलांनी लिहिते झाले पाहिजे
चाकोरीबद्ध आयुष्याचा धोपटमार्ग सोडून अधिकाधिक महिलांनी आपले आलेले अनुभव शब्दबद्ध करण्यासाठी लिहिते झाले पाहिजे, अशी अपेक्षा प्रसिद्ध लेखिका डॉ. मीना प्रभू यांनी व्यक्त केली. मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांरंभाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी प्रभू बोलत होत्या. घुमान येथील साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मंडळाच्या कार्यकारी विश्वस्त डॉ. मंदा खांडगे, डॉ. कल्याणी दिवेकर, अध्यक्षा डॉ. ज्योत्स्ना आफळे, कार्यवाह मीरा शिंदे या वेळी उपस्थित होत्या. ‘ज्ञानाचा उत्सव करण्यास हरकत नाही’, असे ज्ञानेश्वर माऊलींनीच म्हटले आहे. त्यामुळे साहित्यनिर्मिती, पुस्तक प्रकाशन, साहित्य संस्थांचे उपक्रम हा साहित्यप्रेमाचा भाग असून त्यामध्ये महिलांचा सहभाग मोठा आहे. साहित्याच्या सर्वच प्रांतात महिलांनी मोठी मजल गाठली आहे, असे डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2014 3:20 am

Web Title: meghana pethe write women
Next Stories
1 शिक्षण मंडळ सभापतींचा राजीनामा घ्या – अजित पवार
2 बनावट जामीनपत्र तयार केल्याचे प्रकरण
3 सुप्त कलागुणांमधून जागविली जगण्याची उमेद
Just Now!
X