23 October 2019

News Flash

मराठय़ांच्या इंग्रजांवरील विजयाच्या आठवणी ताज्या होणार

खंडाळय़ातील भैरवनाथाचे तळे, काल्र्याचे तळे, तळेगाव आणि वडगावच्या युद्धभूमीवर मराठय़ांनी इंग्रजांवर मिळवलेल्या देदीप्यमान विजयाच्या आठवणी ताज्या होणार आहेत.

| December 27, 2014 02:10 am

खंडाळय़ातील भैरवनाथाचे तळे, काल्र्याचे तळे, तळेगाव आणि वडगावच्या युद्धभूमीवर मराठय़ांनी इंग्रजांवर मिळवलेल्या देदीप्यमान विजयाच्या आठवणी ताज्या होणार आहेत. ३१ डिसेंबर १७७८ ते १६ जानेवारी १७७९ या कालखंडात घडलेल्या या संग्रामाचे युद्धशास्त्रीय विश्लेषण जाणून घेण्याची संधी इतिहासाचे विद्यार्थी आणि अभ्यासकांसाठी चालून आली आहे.
या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘इंग्रज मराठा वडगाव युद्ध स्मारक समिती’तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात युद्धशास्त्र व इतिहासातील तज्ज्ञांचे विचार त्या त्या युद्धभूमीवर जाऊन ऐकायला मिळणार आहेत. समितीचे अध्यक्ष व इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सहसचिव श्रीनिवास कुलकर्णी, शंतनू पेंढारकर या वेळी उपस्थित होते.
‘इंग्रजांशी लढताना समाज कसा एकसंध राहिला आणि कसा यशस्वी झाला हे नागरिकांसमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे. युद्धशास्त्राच्या दृष्टीने मराठय़ांचा इतिहास उलगडण्याबरोबरच त्या काळी कुठे चुका घडल्या का हेदेखील शोधणे गरजेचे आहे,’ असे बलकवडे यांनी सांगितले. ३१ डिसेंबर २०१४ ला खंडाळय़ातील भैरवनाथाच्या तळय़ावर, ४ जानेवारी २०१५ला काल्र्याच्या तळय़ावर, ९ जानेवारीला तळेगावमध्ये तर १६ जानेवारीला वडगावच्या महादजी शिंदे युद्ध स्मारक भूमीवर ही व्याख्याने होणार आहेत. बलकवडे यांच्यासह कर्नल रवींद्र शेटे, इतिहासकार डॉ. उदय कुलकर्णी, निनाद बेडेकर, मेजर जनरल शशिकांत पित्रे, डॉ. सदाशिव शिवदे, ब्रिगेडियर हेमंत महाजन, लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर आणि अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे आदींचे विचार या वेळी ऐकायला मिळतील.  
वडगावचा इतिहास काय?
‘रघुनाथराव पेशवे पदच्युत झाल्यानंतर पुन्हा पेशवाई प्राप्त करण्याच्या लालसेने ते इंग्रजांच्या आश्रयाला गेले. पेशवाईच्या बदल्यात निम्मे मराठी राज्य गिळंकृत करण्याच्या बोलीवर इंग्रज मुंबईहून मोठी फौज घेऊन पुण्याकडे निघाले. त्या वेळी महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठा मंडळ एक झाले आणि इंग्रजांसारख्या आधुनिक व बलाढय़ शत्रूशी शिवरायांच्या गनिमी काव्याचा अवलंब करण्याचा निर्णय महादजींनी घेतला. त्यानंतर ३१ डिसेंबर १७७८ला खंडाळय़ाच्या तळय़ावर, ४ जानेवारीला काल्र्याच्या तळय़ावर, ९ जानेवारीला तळेगावावर व १३ जानेवारीला वडगावच्या युद्धभूमीवर मराठय़ांनी इंग्रजांचा पराभव केला. अखेर १६ जानेवारी १७७९ ला याच भूमीवर इंग्रजांना मराठय़ांना शरण जावे लागले’ असे बलकवडे यांनी सांगितले.
कसे जाल?
इच्छिुकांनी व्याख्यानाच्या ठिकाणी पोहोचण्याविषयी माहिती घेण्यासाठी बलकवडे यांना ९४२३००८३८३ किंवा कुलकर्णी यांना ९८२२०५१५७४ या दूरध्वनी क्रमांकांवर दुपारी ४ नंतर संपर्क साधावा असे आयोजकांनी कळवले आहे.

First Published on December 27, 2014 2:10 am

Web Title: memoir of maratha history
टॅग Pune 2