राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘शिवशक्ती संगम’च्या निमित्ताने मारुंजी गावातील एका शेतकरी कुटुंबात सरसंघचालक मोहन भागवत एक दिवस वास्तव्याला होते आणि या काळात त्या घरातील सर्वाशी ज्या आत्मीयतेने सरसंघचालकांनी नाते जोडले, त्या आठवणी आता आधुनिक शेतकरी अशी ओळख असलेल्या राजेश भुजबळ यांच्या कुटुंबीयांसाठी मनात सदैव जपून ठेवाव्या, अशा ठरल्या आहेत.
हिंजवडीजवळील मारुंजी येथे संघाच्या प. महाराष्ट्र प्रांताचे महासंमेलन निश्चित झाल्यानंतर गेले सहा महिने सुमारे सात हजार स्वयंसेवक विविध व्यवस्थांमध्ये काम करत होते. सरसंघचालक भागवत यांची निवासाची व्यवस्था करण्यासाठी कार्यक्रम स्थळाजवळच घर असलेल्या भुजबळ यांच्याकडे तीन महिन्यांपूर्वी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विचारणा केली होती. तेव्हा त्यांच्या घराचे काम अर्धवट होते आणि त्यांना एवढय़ात ते पूर्णही करायचे नव्हते. मात्र, भागवत यांच्या वास्तव्यासाठी ती वास्तू देण्याचे ठरल्यानंतर भुजबळ यांनी १५ लाख रुपये खर्चून तीन महिन्यांत उर्वरित सर्व कामे मोठय़ा घाईने पूर्ण करून घेतली.
कार्यक्रमाच्या दिवशी, ३ जानेवारीला सकाळी दहाच्या सुमारास भागवत यांचे तेथे आगमन झाले. भुजबळ परिवारातील महिलांनी त्यांचे औक्षण केले. या वेळी त्यांच्यासमवेत सरकार्यवाह भय्याजी जोशी हेही होते. घरात येताच त्यांनी प्रवेशद्वाराजवळील गणपतीच्या छायाचित्राला नमस्कार करून तेथे दिवा लावला. बैठकीच्या खोलीत आल्यानंतर त्यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांची ओळख करून घेतली. काही प्रश्न असतील तर मनमोकळेपणाने विचारा, असे मुलांना सांगितले. तेव्हा, या वयातही कामाचा व्याप आणि इतका प्रवास कसे करता, असा प्रश्न एका लहानग्याने विचारला. तेव्हा इच्छा असल्यास सर्वकाही करता येते. पहिल्यांदा एक वीट लावावी लागते, त्यावर एकेक वीट लावली की भिंत तयार होते, असे उत्तर भागवत यांनी दिले.
घरगुती जेवण असावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केल्याने ज्वारीची भाकरी, मटकीची उसळ व बटाटय़ाची भाजी, खर्डा आणि वरणभात असा जेवणाचा बेत होता. जेवणासाठी टेबलवर न बसता ते सतरंजीवर भारतीय बैठकीत बसले. राजेश यांचे वडील मुरलीधर भुजबळ यांना त्यांनी शेजारी बसवून घेतले. जेवणानंतर त्यांनी त्यांच्याशी शेतीवर चर्चा केली. शेती सर्वोत्तम असून हीच काळाची गरज आहे. नैसर्गिक शेतीवर भर दिला पाहिजे. भारतीय माती उपयुक्त असून आपल्याकडे सगळे पिकते, अशी चर्चा या वेळी झाली.
दुपारी विश्रांतीनंतर ते कार्यक्रमासाठी रवाना झाले. जाताना त्यांनी भुजबळ कुटुंबीयांनी तेथे उपस्थित राहावे, असा आग्रह केला. कार्यक्रम संपल्यानंतर रात्रीच्या जेवणात वांग्याची भाजी, भेंडीची भाजी आणि भाकरी हा बेत होता. राजेश यांची कन्या ऋतुजा वैद्यकीय शिक्षण घेत आहे, तिच्याशी त्यांनी आहारविषयक चर्चा केली. घरातील सदस्यांशी चर्चा करताना देशहिताचे काही ना काही काम करा, असेही त्यांनी सांगितले. रात्री गादीवर न झोपता ती बाजूला ठेवून सतरंजी अंथरून ते जमिनीवरच झोपले.
मुक्कामाच्या दुसऱ्या दिवशी, सोमवारी न्याहारीसाठी भुजबळ परिवाराने खास मिसळीचा बेत केला, तो भागवतांना खूपच आवडला. या भेटीची आठवण म्हणून घरासमोर भागवत यांच्या हस्ते फणसाचे झाड लावण्यात आले. झाड लावून पुन्हा घरात आल्यानंतर त्यांनी सर्व महिला सदस्यांना व मुलांना बोलावून घेतले. गप्पांमध्ये एका दानशूर राजाची गोष्ट सर्वाना सांगितली. त्यानंतर, सर्वाचा निरोप घेताना सर्वाना नागपूरला येण्याचे निमंत्रण त्यांनी दिले आणि येताना त्या झाडाचे फणस आणि बागेतील पेरू आणण्याची सूचनाही त्यांनी गमतीने केली.
अविस्मरणीय क्षण
मोहन भागवत यांची भेट हा आमच्या कुटुंबीयांच्या दृष्टीने सर्वात अविस्मरणीय क्षण असल्याची भावना राजेश भुजबळ यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सोमवारी व्यक्त केली. अतिशय साधी राहणी व उच्च विचार असणाऱ्या या व्यक्तीसोबतचा हा सहवास आमच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण ठेवा आहे असे ते म्हणाले.