News Flash

मनोरुग्णालयात ‘फॅमिली वॉर्ड’ सुरू करण्याचा विचार!

येरवडा मनोरुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांबरोबर त्यांच्या नातेवाइकांना राहता यावे यासाठी मनोरुग्णालयात ‘फॅमिली वॉर्ड’ सुरू करणे विचाराधीन आहे.

येरवडा मनोरुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांबरोबर त्यांच्या नातेवाइकांना राहता यावे यासाठी मनोरुग्णालयात ‘फॅमिली वॉर्ड’ सुरू करणे विचाराधीन आहे. मनोरुग्णांचा मनोरुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी करण्याचा उद्देश यामागे असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली.
इतर आजारांच्या रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या रुग्णाबरोबर त्याच्या एखाद्या नातेवाइकाला राहण्याची सोय असते. मनोरुग्णालयात मात्र अशा प्रकारे नातेवाइकांना राहण्याची परवानगी नाही. येरवडय़ाच्या मनोरुग्णालयात सध्या २५४० मनोरुग्ण असून यातील १६०० पुरूष व ९४० स्त्रिया आहेत. यातील अनेक मनोरुग्ण या रुग्णालयात अनेक वर्षांपासून राहात असून बऱ्याच जणांचे नातेवाईक त्यांना घरी नेण्यास तयार नाहीत, तर काहींच्या कुटुंबाचा पत्ता नाही. मनोरुग्णांच्या नातेवाइकांनाही त्यांच्याबरोबर मनोरुग्णालयात राहता यावे यासाठी स्वतंत्र कक्ष बांधण्याबाबतचा प्रस्ताव २००५ मध्येच मांडण्यात आला होता. आता या कक्षासाठी ९४ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे परंतु नवीन कक्ष बांधायला तो पुरेसा नाही. परंतु मनोरुग्णालय परिसरात बांधलेल्या ५८ इमारती डागडुजीनंतर वापरण्याजोग्या स्थितीत आहेत. ‘यातील २ ते ३ कक्षांचे नूतनीकरण करुन ते फॅमिली वॉर्ड म्हणून वापरण्यास सुरूवात करता येईल. त्यासाठीचा आराखडाही तयार केला आहे,’ असे मनोरुग्णालय अधीक्षक डॉ. भालचंद्र डोंगळीकर यांनी सांगितले. ‘फॅमिली वॉर्ड’च्या संकल्पनेविषयी ते म्हणाले,‘‘नातेवाईक मनोरुग्णाबरोबर राहणार असतील तर ठराविक दिवसांनंतर त्याला घरी नेण्याकडे त्यांचा कल राहू शकेल. मनोरुग्णालय केवळ मनोरुग्णांना सोडून जाण्याचे ठिकाण असल्याची प्रवृत्ती कमी होईल.’’
वर्षांतून एकदा नागरिकांसाठी
मनोरुग्णालय खुले ठेवण्याचा प्रस्ताव
वर्षांतून एकदा नागरिकांना मनोरुग्णालय आतून पाहण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. विविध संस्थांप्रमाणेच मनोरुग्णालयालाही ‘ओपन डे’ असावा असा रुग्णालय प्रशासनाचा प्रस्ताव असून त्या दिवशी १५ ते २० जणांच्या गटाने येणाऱ्या नागरिकांना मनोरुग्णालयातील सामाजिक कार्यकर्ते व व्यवसाय प्रशिक्षकांसह मनोरुग्णालयाचे कामकाज दाखवता येईल, अशी माहितीही डॉ. डोंगळीकर यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2015 2:35 am

Web Title: mental hospital family ward
टॅग : Mental Hospital
Next Stories
1 ‘स्मार्ट सिटी’वरील चर्चेत शहरातील तीनही आमदारांची ‘दांडी’
2 ख्रिसमसला पौर्णिमेची रात्र
3 भारतरत्न सर्व संतांचे ब्राह्मणीकरण केले गेले – डॉ. रावसाहेब कसबे
Just Now!
X