आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर तंत्रज्ञानाभिमुख युवा पिढीमध्ये राजकीय जागृती घडवून आणण्याच्या उद्देशातून ‘मेरा पीएम कौन’ या ऑनलाईन खेळाची निर्मिती नीती सोल्यूशन्स या संस्थेने केली आहे. हा खेळ खेळणाऱ्या व्यक्तीने विविध शंभर मुद्दय़ांच्या आधारे हे प्रश्न सोडविण्यासाठी कोणता नेता सक्षम आहे याची उत्तरे एका ‘क्लिक’वर द्यावयाची आहेत.
देशात ४५ कोटी मतदार युवा आहेत. त्यातील अनेक जण इंटरनेट आणि फेसबुक या माध्यमातून ‘वन वे मीडिया’ पद्धतीने तंत्रज्ञानाशी जोडले गेलेले आहेत. त्यांच्यामध्ये राजकीय जागृती घडवावी आणि देशापुढील विविध समस्यांची जाण होऊन ते प्रश्न कोण सोडवू शकेल याची माहिती घेण्याच्या उद्देशातून अशा पद्धतीने विकसित केलेला खेळ हा जगभरातील पहिलाच प्रयत्न असावा, असा दावा नीती सोल्यूशन्सचे डॉ. पराग माणकीकर यांनी केला. www.merapmkaun2014.in  या संकेतस्थळाला भेट देऊन कोणालाही या खेळामध्ये सहभाग घेता येईल. त्याचप्रमाणे प्रत्येकाला आपल्या मोबाईलवरदेखील हा खेळ खेळता येणार असल्याचे माणकीकर यांनी सांगितले.
या खेळाच्या माध्यमातून युवा मतदारांचे राजकीय प्रश्नांसंदर्भात प्रशिक्षण करण्यात येणार आहे. बेरोजगारी, दहशतवाद, नागरी समस्या यांसह विविध शंभर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी कोणता राजकीय नेता सक्षम आहे असे वाटते, याचे उत्तर हा खेळ खेळणाऱ्याने विविध नेत्यांच्या अर्कचित्रांवर क्लिक करून द्यावयाचे आहे. नरेंद्र मोदी, राहुल गांधी, अरिवद केजरीवाल, जयललिता, ममता बॅनर्जी असे विविध पर्याय देण्यात आले आहेत. या खेळाच्या माध्यमातून युवकांमध्ये राजकीय जाण येईल. त्याचबरोबर राजकीय पक्षांनाही निवडणूकपूर्व अंदाजाचा वेध घेणे शक्य होणार आहे. किमान ५० लाख युवक-युवती या खेळामध्ये सहभाग घेतील, अशी अपेक्षा असल्याचेही माणकीकर यांनी सांगितले.