30 September 2020

News Flash

‘मर्सिडीझ-बेंझ’चे पुण्यातील सुरुवातीचे सर्व कामगार १८ वर्षांनीही कंपनीच्या सेवेत

प्रशिक्षित आणि दर्जेदार काम करणारे कामगार टिकवणे हे कंपन्यांसाठी आव्हानच! त्यातही मोठी स्पर्धा असलेल्या वाहननिर्मिती क्षेत्रात तर प्रशिक्षित कामगारांची पळवापळवी सुरूच असते.

| June 6, 2014 03:15 am

हल्ली कामगार अनेक मिळतात, पण प्रशिक्षित आणि दर्जेदार काम करणारे कामगार टिकवणे हे कंपन्यांसाठी आव्हानच! त्यातही मोठी स्पर्धा असलेल्या वाहननिर्मिती क्षेत्रात तर प्रशिक्षित कामगारांची पळवापळवी सुरूच असते. अशा वातावरणातही ‘मर्सिडीज-बेंझ’ कंपनीने पुण्यातील आपले सुरुवातीचे सर्व १२० कामगार अठरा वर्षांनंतरही टिकवून ठेवले आहेत. विशेष म्हणजे कंपनीचे भारतातील कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इबेरहार्ड कर्न यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खास ही माहिती नमूद केली.
‘मर्सिडीज’च्या नव्या ‘एस-क्लास ३५० सीडीआय’ या आलिशान वाहनांचे भारतातील उत्पादन सुरू केल्याची घोषणा करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. मर्सिडीज वाहनांची निर्मिती भारतात १८ वर्षांपूर्वी पहिल्यांदा सुरू करण्यात आली. ती ‘डॅमलर-क्राइसलर’ या नावाने टेल्कोच्या चिखली येथील प्रकल्पात होत होती. त्या वेळी या प्रकल्पात कामगार म्हणून १२० जणांना घेतले होते. या कामगारांना खास प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत उत्पादन करून घेण्यात येत होते. या सर्वच मोटारींच्या निर्मितीसाठी दर्जा आणि नेमकेपणा आवश्यक असल्याने या कामगारांना तसे प्रशिक्षण देण्यात आले होते.
पुढच्या काळात प्रकल्प विस्तारात गेला आणि वाहनांची निर्मिती संख्याही वाढवण्यात आली. २००९ साली चाकण येथे ‘मर्सिडीज-बेंझ’चा स्वतंत्र प्रकल्प सुरू झाला. त्यानंतरही कंपनीत येणाऱ्या इतर कामगारांचे प्रशिक्षण व कामाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी सुरुवातीच्या १२० कामगारांचा उपयोग झाला. पुढच्या काळात या कामगारांनी कंपनीसाठी वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या. काही जण प्रत्यक्ष वाहननिर्मितीच्या प्रक्रियेत आहेत, तर काही जण व्यवस्थापक म्हणूनही कर्यरत आहेत. मात्र, १८ वर्षांच्या काळात या कामगारांपैकी सर्वच्या सर्व मर्सिडीजचा भाग आहेत, असे कर्न यांनी सांगितले.
जगभरातील कामगारांना प्रशिक्षण
कंपनीच्या भारतातील सुरुवातीच्या कामगारांमार्फत इतर देशांमधील कामगारांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे. ते कंपनीचा गाभा म्हणून कार्यरत आहेत. यापैकी बहुतांश कामगारांत पुणे परिसरातील कामगारांचाच समावेश आहे. ही आमची संपदा असल्याचे कर्न यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2014 3:15 am

Web Title: mercedes benz workers services
टॅग Mercedes Benz
Next Stories
1 शांता शेळके यांचे अप्रकाशित लेखन ‘उन्हे आणि सावली’तून वाचकांच्या भेटीला
2 शहरातील मोबाइल टॉवरचे सर्वेक्षण संशयास्पद
3 मान्सून आज केरळात पोहोचणार?
Just Now!
X