शहरात स्थानिक संस्था कराची (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) वसुली सुरळीतपणे सुरू असताना आता काही राजकीय नेत्यांच्या प्रयत्नांना व्यापारी प्रतिनिधींनी बळी पडू नये, असे आवाहन काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे. जे व्यापारी या शहरात व्यवसाय करतात त्यांचा शहराच्या सोयीसुविधांसाठी कर द्यायला विरोध का, असाही प्रश्न विचारण्यात आला असून, नागरिकांकडून घेतलेला कर व्यापारी फक्त महापालिकेला भरतात. ते स्वत:चे पैसे देत नाहीत, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
शहरातील व्यापारी संघटनांनी एलबीटीला पुन्हा एकदा विरोध सुरू केला असून त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य गोपाळ तिवारी यांनी याबाबत पत्रकार परिषदेत व्यापारी नेत्यांच्या भूमिकेवर टीका केली. शहराच्या विकासासाठी, सोयी-सुविधांसाठी जो निधी महापालिकेला आवश्यक आहे, तो एलबीटीच्या माध्यमातून संकलित केला जात असेल, तर या सोयी-सुविधांचा लाभ घेणाऱ्या व्यापाऱ्यांचा एलबीटीला विरोध का, अशी विचारणा तिवारी यांनी या वेळी केली.
एलबीटीबाबत काही राजकीय नेत्यांची राजकीय कुरघोडी सुरू असून त्याला व्यापारी प्रतिनिधींनी बळी पडू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. शहराच्या विकासाची व्यापाऱ्यांची काही जबाबदारी नाही का, अशीही विचारणा तिवारी यांनी केली आहे. ते म्हणाले की, काही निवडक व्यापारी नेत्यांनी पुन्हा एकदा ज्या धमक्या द्यायला सुरुवात केली आहे त्याला आम्ही जुमानणार नाही. एलबीटी वसुलीत आजपर्यंत एकाही व्यापाऱ्याला त्रास दिला गेलेला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांचा जाच होतो, इन्स्पेक्टर राज येते वगैरे तक्रारीतही तथ्य नाही. त्यामुळे व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींकडून एलबीटीला निव्वळ राजकीय विरोध सुरू आहे.