राज्यात तापमानाचा पारा चढू लागला असून, अनेक भागात रविवारी पारा चाळिशीजवळ पोहोचला आहे. त्यामुळे चांगलाच उकाडा वाढला असून, अंगाची लाही-लाही होत आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ातील अनेक शहरात पाऱ्याने चाळिशी ओलांडली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्य़ांच्या ठिकाणचे तापमान सरासरीच्या वर गेले आहे. सध्याची हवामानाची स्थिती पाहता तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त आहे.
गेल्या काही दिवसात राज्यात वादळी पाऊस व गारपीट झाली होती. पावसाच्या सरीही पडल्या होत्या. त्यामुळे तापमान ३५ अंशांच्या खाली आले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पारा वाढू लागला आहे. मुंबईतही तापमान वाढले असून, घामाच्या धारांनी मुंबईकर त्रस्त झाले आहेत.
शहरांचे कमाल तापमान : पुणे ३९.४, जळगाव ४२.३, कोल्हापूर ३८.२, मालेगाव ४३.५, नाशिक ४०, सोलापूर ४०.८, मुंबई ३४.४, औरंगाबाद ३९.९, परभणी ४०.२, अकोला ४१.६, अमरावती ४१.८, चंद्रपूर ४०.४, नागपूर ४२.८ आणि वर्धा ४३ अंश सेल्सिअस.

नागपूर
वर्धा ४३ अंशांवर
वर्धा शहरात सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नागपूरमध्ये ४२.८ अंश तापमान असून, महाराजबाग संग्रहालयातील वाघानेही थंडाव्यासाठी पाण्यात बैठक मारली.