बँक ठेवी विमा मंडळाच्या सहकार्याने रुपी सहकारी बँकेचे सारस्वत बँकेत विलीनीकरण सुसह्य़ होणार आहे. महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक फेडरेशनने याबाबत अतिशय अभ्यासपूर्वक प्रस्ताव तयार केला असून त्यामुळे रुपी बँक व सारस्वत बँक या दोघांनाही हे विलीनीकरण सोपे होणार आहे, अशी माहिती फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
ठेवींना एक लाख रुपयांपर्यंतच्या विमा संरक्षण असते. रुपी बँकेच्या १४८२ कोटी रुपयांच्या ठेवींपैकी ९६५ कोटी रुपयांच्या ठेवी एक लाख रुपयापर्यंतच्या असल्यामुळे त्यांना विमा संरक्षण आहे. बँकेची मालमत्ता व गंगाजळी मिळून शंभर कोटी रुपये आहे. १२० कोटी रुपयांच्या ठेवींवर ११० कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. सरकारी कर्ज रोखे, अन्य बँकांमधील ठेवी, रिझव्र्ह बँक व अन्य बँकांमधील खात्यांमधील रक्कम, तसेच बँकेकडील रोख रक्कम अशी एकूण ६७० कोटी रुपयांची रोख तरलता आहे. त्यामुळे ही बँक घेऊ इच्छिणाऱ्या बँकेस प्रत्यक्षात १०८ कोटी रुपयांचा बोजा बसणार आहे. तथापि ही गुंतवणूक केल्यावर शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ बँकिंग क्षेत्रात कार्यरत असलेली रुपी बँक घेणाऱ्या सारस्वत बँकेस रुपी बँकेच्या ३५ शाखा, चार विस्तारित कक्ष व सहा लाखांपेक्षा जास्त खातेदार मिळणार आहेत. हे लक्षात घेऊनच सारस्वत बँकेने रुपी बँक घेण्याची तयारी दर्शविली. यापूर्वी ही बँक घेण्यासाठी त्यांनी दोन वेळा सादर केलेले प्रस्ताव रिझव्र्ह बँकेने अमान्य केले होते. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक फेडरेशनने अवघ्या तीन महिन्यांमध्ये अतिशय बारकाईने रुपी बँकेच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करीत रिझव्र्ह बँकेकडे बँक विलीनीकरणाचा प्रस्ताव सादर केला आणि त्यास रिझव्र्ह बँकेने तत्त्वत: परवानगी दिली. आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रयत्नांमुळे सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांनी रुपी बँकेच्या विलीनीकरणाबाबत अनुकूलता दर्शविली व महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांबाबत चर्चा केली.
रुपी बँकेच्या कारभारावर २००२ पासून रिझव्र्ह बँकेने अतिशय बारकाईने लक्ष ठेवले होते. ३१ मार्च २०१२ रोजी बँकेच्या ठेवी १४८२.३२ कोटी रुपये तर कर्जव्यवहार ७४४.८३ कोटी रुपये होता. अनुत्पादित कर्जाचे प्रमाण ५१.६० टक्के होते तर बँकेला ४९०.३१ कोटी रुपये तोटा आला होता. ही स्थिती लक्षात घेऊनच रिझव्र्ह बँकेने २२ फेब्रुवारी २०१३ रोजी रुपी बँकेवर व्यवहाराबाबत अधिस्थगन (मोराटोरियम) आणले होते व मार्च २०१३ मध्ये संचालक मंडळ बरखास्त केले.